आधीच लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या पोलीस दलात सुमारे दिड लाख पोलिस कमी आहेत. आरोग्य विभागात सुद्धा लाखभर कर्मचारी कमीच आहेत अशा परिस्थितीत सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. कोणत्याच सरकारला वाटत नसते माणसं मरावी पण शेवटी एक वेळ येत असते जेव्हा हात टेकावेच लागतात. मग हिच ती वेळ जी आपल्या सर्वांना स्वयं निर्बंध घालून मारून न्यायची आहे.

काही काम नसताना उगं चौकातले पोलिस ओळखीचे आहेत म्हणून फिरणारे, घरात किराणा असताना रोज पाव पाव किलो वस्तू घेण्यासाठी किराणा दुकानात जाणारे, डॉक्टरचे लेटरप्याड घेऊन रोज नवीन औषध लिहून बाहेर पडणारे, खोटी ओळखपत्रे दाखवून फ्रंट लाईन कर्मचारी म्हणून फिरणारे अशा वाय झेड व्यक्तींना पोलिसांच्या फायबर काठीचा प्रसाद नितांत गरजेचा आहे.

अपुरे मनुष्यबळ, अपुरी रुग्णालये, अपुरे ऑक्सिजन बेड, अपुरे रेमडीसिव्हीअर, अपुरे व्हेंटिलेटर्स, अपुऱ्या अँबुलन्स, अपुरे कोविड सेंटर्स, हे सगळं अपुरे आहे म्हणून या अपुऱ्या व्यवस्थेत पेशंट म्हणून भरती होण्यापेक्षा पुढील पंधरा दिवस घराबाहेर न पडण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवा. स्वतःसह कुटूंबाची काळजी घ्या आणि व्यवस्थेला सहकार्य करा ती आपल्यासाठीच राबत आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ.

विशाल गरड
दिनांक : १४ एप्रिल २०२१