स्वआधार अनाथ मुलींच्या निवासी प्रकल्पातील माझ्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या आज पोस्टाने घरी पोहचल्या. माझ्या ऐपतीनुसार जमेल तेवढी चॅरीटी वेगवेगळ्या माध्यमातुन आजपर्यंत या संस्थेला मी करत आलोय. ईथं केलेली प्रत्येक मदत सत्कार्यी लागतेच याची जाणिव या संस्थेच्या पारदर्शक व्यवहारातुन आणि त्यांनी जोपासलेल्या ऋणानुबंधातुन प्रत्येकालाच होते. तिथल्या लहान बहिनींकडुन मिळणारं प्रेम आणि संस्थापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून मिळणारा आदर सुखावणारा असतो. गेल्या अनेक वर्षापासुनचा राखी पाठवण्याचा उपक्रम तिथल्या मुलींनी जोपासला आहे. राखीचे पाकीट हातात पडल्यानंतर मी ते उत्सुकतेने उघडले तर त्यातली नाविण्यपुर्ण राखी पाहुन त्या मुलींनी किती मोठा विचार पाठवलाय याचाच विचार करत बसलो.

ही राखी करंजीच्या बियांपासुन नैसर्गिक रंग वापरून तयार करण्यात आली असुन या सुंदर आणि आकर्षक पर्यावरण पुरक राख्यांचा उपयोग संपल्यावर त्या मातीमध्ये टाकुन देण्याचा संदेशही सोबतच्या पत्राद्वारे देण्यात आला आहे. या आधी देखील आमच्यात गणपती नसतानाही मी या मुलींनी बनवलेले ईकोफ्रेन्डली गणपती त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन खरेदी केले होते. आज त्यांचा हा राख्यांचा उपक्रम पाहुणही खुप अभिमान वाटला. या संस्थेतल्या बहुतांशी मुली मतिमंद असतानाही अशा पर्यावरण पुरक उपक्रमात काम करण्याची त्यांची गतिमानता नक्कीच कौतुक करण्यासारखी आहे. प्रिय बहिणींनो हा भाऊ तुमच्या रक्षणासाठी आणि सन्मानासाठी सदैव तत्पर राहिल. एकाच आईच्या पोटातुन जन्मलेल्या माझ्या सख्या आणि सामाजिक उदरातुन जन्मलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०७ ऑगस्ट २०१९