फटाकड्यांच्या आवाजांचा आलार्म वाजला की लगबगीने उठून गडबडीत आंघोळ करून नवी कापडं घालून कधी एकदा उदबत्ती पेटवून फटाकड्या उडवायला जातो असे व्हायचे. फटाकड्या उडवल्यानंतर शेणाने सारवलेल्या ओट्यावर लक्ष्मी तोट्यांच्या कागदाचा खच पडायचा ते पाहूण वेगळंच समाधान मिळायचं. त्यातुनच घरच्यांच्या नजरा चुकवून जर एखादा सुतळीबाॅम्ब उडवला की लहानपणीच मोठे झाल्याचा फिल यायचा. सकाळी आई गवळणी घालताना तिची शेणाची शिल्पकला खुप कुतुहलाने पाहायचो आणि सायंकाळी मात्र त्याच गवळणीतल्या नंदी, पेदा, गाई म्हशी या वाळलेल्या शेणाच्या कलाकुसरीत लवंगी फटाकडी लावून बार उडवून द्यायचो.

पहाटेच्या अभ्यंगस्नानावेळी दादा, आण्णा, आबा यांना माझी आत्या तेला सोबत पीठ लावताना मी पण मला पीठ लावा असा बहिणींकडे आग्रह धरायचो पण आई म्हणायची “अंय तुला नसतंय पीठ; फक्त तेलच लाव, तुझं लग्न झाल्यावर मग तुला पण लावायला सांगीन”. गेली तीस वर्ष दिवाळीत फक्त तेलाने माखणारे अंग आज मात्र विराच्या आगमनामुळे ज्वारीच्या पीठात भिजलंय. तीस वर्षाची मळी जणू आजच नेळवाट्या होऊन निघत आहे असं वाटायलंय.

लहाणपणी दिवाळीत फटाकड्या आणि नव्या कापडात गुंतणारा जीव जाणतेपणामध्ये मात्र अभ्यंगस्नान आणि नातीगोती जोपासण्यात लागतो. दिवाळी काल पण तशीच होती, आज पण तशीच आहे आणि उद्याही तशीच राहील फक्त आपण मोठे झालो आहोत. आता लाहाणग्यांचे हट्ट पुरवण्यातच आपला आनंद शोधायचा. जुनी नाती नव्याने प्रकाशमान करायची, अंगाची मळी तेला पीठाने अन् मनातली मळी दिवाळी अंकांनी घासुन काढायची आणि समाजात आकाशकंदीलासारखं चमकत रहायचं. हॅप्पी दिवाली दोस्तांनो

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : ०६ नोव्हेंबर २०१८ ( दिवाळीची पहिली आंघोळ)