फोटोतल्या मागच्या ब्याकग्राऊंडवर जाऊ नका माझ्या सोबत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव कोरणारी महाराष्ट्राची सुकन्या आणि माझी मैत्रीण सोनाली पाटील. ही एक जागतिक दर्जाची ‘जलतज्ञ’ आहे. तिने जल संवादक म्हणून जलसाक्षरता मोहीम सुरू केली. प्रवास शाश्वत विकासासाठी या प्रकल्पांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्यात डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. डेन्मार्क येथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल टॅलेंट म्हणुन जगभरातून तिची निवड करण्यात आली. तिला युनायटेड नेशनचे पाणी आणि दुष्काळ निवारणासाठी प्रशस्तीपत्रक मिळाले असून आजवर तिने इस्राएल मध्ये पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलंय तर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये धरण आणि पाणी पुनर्वापर प्रकल्पावर काम केले आहे. युरोप, नेपाळ, सिंगापूर येथे ‘पाणी’ या विषयावर  तिचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. ती सध्या पाणी आणि जागतिक हवामान बदल यावर पी.एच.डी करत आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात ती त्यांच्या टेंभुर्णी नजिकच्या शेतात राहतेय हे समजताच अरविंद आणि हनुमंतसह फोर्डमध्ये थेट तिचे शेत गाठले. जाण्याआधी अपॉइंटमेंट मागितली कारण आमची याआधीची भेट होऊन जवळ जवळ पाच वर्षे उलटली होती पण कर्तृत्वाचे उंच शिखर गाठूनही ती मात्र तशीच होती. म्हणाली “अरे ये रे केव्हाही अल्वेस वेलकम” देश विदेशात फिरलेल्या, अनेक पुरस्कार मिळवलेल्या, अशा प्रचंड हुशार मैत्रिणीला आपण केव्हाही भेटू शकतो हा मैत्रीला लाभलेला आपुलकीचा पुरस्कारच असतो. आयुर्वेदावरही तिचा अभ्यास तगडा आहे. तिच्या सोबत आपण जेवढा वेळ घालवू तेवढा वेळ आपणही शाश्वत विचार करायला लागतो हे माझ्या अनुभवातून सांगतो. बाकी आम्ही घरी गेल्यावर सोनूच्या माँ ने केलेल्या आदरातिथ्याने भारावून गेलो.

बऱ्याच वर्षांनी आज तिची भेट झाली. आम्ही बोलताना वारुळातून मुंग्यांची झुंड निघावी तशा नवनवीन कल्पना सोनूच्या मेंदूतून निघत होत्या. अशा व्यक्तिमत्वासोबतच तास दोन तासांची भेट म्हणजे संबंधित विषयातल्या पाच पन्नास पुस्तकांची उजळणी असते. सोनालीचे वडील भारत पाटील हे निवृत्त डि.वाय.एस.पी असून रिटायरमेंट नंतर त्यांनी गावाकडे सेंद्रिय शेतीवर मोठे काम उभारले आहे. सोनाली सुद्धा वडिलांकडून शेतीचे धडे घेता घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन सस्टेनेबल इंडिया या प्रोजेक्टवर काम करत आहे. ती करोडोची मालकीण आहे पण करोडो रुपये देऊनही मिळवता येणार नाही एवढा डाऊन टू अर्थ तिचा स्वभाव आहे. तिचे विचार गावकुसात जन्म घेऊन चंद्रावर जाणाऱ्या मुलीचे प्रतिनिधित्व करतात. भारतातल्या एक टक्के पोरींनी जरी सोनालीला फॉलो केले तरी प्रचंड मोठे कार्य घडू शकते.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०