बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथे गावकरी मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असता स्थानिक प्रशासनाने तो जबरदस्ती करुन चुकीच्या पद्धतीने काढला असल्याची घटना सोशल मिडीयावर पाहिली. सर्वप्रथम ज्या पद्धतीने पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा मी निषेध करतो. कोणतेही स्मारक किंवा पुतळा हा संबंधित स्थानिक प्रशासन आणि राज्यशासनाच्या रितसर सर्व परवाणग्या घेऊनच उभारायला पाहिजे या मताचा मी आहे.

कोणत्याही महापुरूषांचा पुतळा उभा करणे जितके सोपे तितकेच त्याचे संरक्षण अवघड असते. म्हणुनच जे पुतळे किंवा स्मारके रितसर परवाणग्या घेऊन उभारली जातात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असते. परंतू समजा जरी एखादा पुतळा लोकांकडून विनापरवाना उभारला गेलाच तरी त्यांना त्यासंदर्भातल्या सर्व गोष्टी समजून सांगुन योग्य ती खबरदारी घेऊनच आदराने तो स्थलांतरीत करायला हवा. अशावेळी आणला जेसीबी आणि काढला पुतळा असा मुर्खपणा करू नये कारण आजच्या काळात पुतळा जरी निर्जिव असला तरी त्याला चिटकलेल्या भावना मात्र तितक्याच जिवंत असतात हे प्रशासनाने ध्यानात ठेवायला हवे.

पुतळा कोणत्याही महापुरूषाचा असुद्यात तो उभा करताना प्रत्येक समाजाच्या भावना शुद्ध आणि पवित्रच असतात परंतु काही समाजकंटक मात्र अशा पुतळ्यांचा व स्मारकांचा उपयोग विटंबना करून दंगली भडकावण्यासाठीही करत असतात. समाजकंठकांचा असला कुटील डावही आपण वेळीच हाणुन पाडायला हवा. सरतेशेवटी महापुरूषांचे विचार ह्रदयात जिवंत ठेवा. भविष्यात त्यांच्या नावावर दंगली आणि कत्तली झाल्या तर आपल्याकडुनही महापुरूषांच्या विचारांची विटंबना होईल. ती होऊ नये म्हणुनच हा लेखप्रपंच.

( टिप : सदर घटनेचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडियावरून शेअर करणे टाळावे. निषेध नोंदवण्यासाठी पुतळ्याची विटंबना कशी झाली हे दाखवायची गरज नाही. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणुन निषेध महत्वाचा )

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ मार्च २०१९