पुनःश्च हरिओम हा मराठी चित्रपट आज झी टॉकीजवर आम्ही सहकुटुंब पाहिला. आपल्यापैकी बहुतांशी जणांनी अनुभवलेलं हे कथानक माझा प्रिय दोस्त विठ्ठल आणि स्पृहाच्या दमदार अभिनयाने सजवलं गेलंय. सर्वच सहकलाकारांचा अभिनय दर्जेदार झाला असून या चित्रपटातले खूप सारे प्रसंग थेट आपल्या हृदयाला भिडणारे आहेत. शेवटी जेव्हा दिपालीच्या हातात तो चेक ठेवला जातो तेव्हा डोळ्यातील अश्रूंना बाहेर या म्हणायची गरजच पडत नाही ते आपसूक ओघळतात. संसाराला दोन चाके असतात त्यातलं एक बाहेर फिरत असतं तर एक घरातल्या घरातच फिरत असतं, बायको नावाच्या चाकाला विनाकारण ब्रेक लावण्यापेक्षा जर त्याला आपल्यासोबत फिरण्याची मुभा दिली तर संसाराची गाडी सुसाट धावायला मदत होते. हेच पुनःश्च हरी ओम पाहून अधोरेखित होतं.

चित्रपटाची शूटिंग म्हणलं तर सोपी म्हणलं तर तितकीच अवघड होती, लोकेशन्स फार नसल्या तरी वादळ आलेला सीन आणि रेसिपी तयार करतानाचे शूटिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगावकर याने मोठ्या खुबीने केलं आहे. प्रत्येक फ्रेम मधली विविधता विविधने खूप सुंदररित्या टिपली आहे. स्पृहाच्या शब्द उच्चाराचा मी पहिल्यापासूनच फॅन आहे म्हणूनच तिला नुसतं बोलताना पाहणे सुद्धा आमच्यासाठी स्पृहणीय गोष्ट असते. दिपालीची भूमिका तिने मस्त साकारली आहे. विठ्ठलने सुद्धा रवीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय. बॉक्स ऑफिसवर मसाला असलेले चित्रपट गल्ला जमवतात हे ‘झी’ला चांगलं ठाऊक आहे तरीदेखील लॉकडाऊन मधलं सर्वसामान्य लोकांचं जगणं दाखवण्यासाठी ‘झी’ने केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

याआधी ‘राक्षस’ आणि ‘कागर’ सारख्या चित्रपटातून विठ्ठल काळेला आपण पाहिलेच असेल. चितळेच्या जाहिरातीतला एस.टी ड्रायव्हर सुद्धा तुम्ही विसरला नसालच. शॉर्ट फिल्मस वगैरे म्हणाल तर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘काजरो’सह शेकडो शॉर्ट फिल्मस विठ्ठलच्या अभिनयाने सजल्या आहेत. सई ताम्हणकर, रिंकू राजगुरूसह आजपर्यंत कितीतरी आर्टिस्ट सोबत विठ्ठलने स्क्रिन शेअर केली आहे. बार्शी तालुक्यातील पानगाव सारख्या छोट्याशा गावातुन सुरू झालेला त्याचा प्रवास त्याच गावातल्या प्रत्येक टीव्हीवर दिसण्या इतपत येऊन ठेपलाय हे प्रचंड अभिमानाने सांगण्यासारखं आहे.

विठ्ठलच्या नावात ‘ठ’ ला ‘ठ’ जितकं घट्ट चिटकलंय तेवढंच घट्ट त्याचा अभिनय सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाला चिटकला आहे. काही अभिनेते चार दोन चित्रपट करतात आणि लुप्त होऊन जातात पण विठ्ठल म्हणजे दगडावर उगवलेलं झाड आहे जे दुष्काळात सुद्धा तग धरेल म्हणूनच राजकारणात जसे काही नेते मंडळी सरपंच ते केंद्रीय मंत्री पर्यंतचा प्रवास करतात तसाच विठ्ठलचा ज्युनिअर आर्टिस्ट ते लीड रोल पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. विठ्ठलचा स्ट्रगल एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल एवढा जबरदस्त आहे पण त्याला दुःखाचे आणि परिस्थितीचे भांडवल करायला आवडत नाही म्हणून त्याच्या आयुष्यातला संघर्ष काळ लिहिणे मी मुद्दामच टाळतो. अभिनयावर असलेली विठ्ठलची भक्ती त्याला अजून मोठी उंची प्राप्त करून देईल यात शंकाच नाही.

आपण कितीही मोठ्या पडद्यावर दिसोत पण जोपर्यंत आपण आपल्या घरातल्या टिव्हीत दिसत नाहीत तोपर्यंत हिरो झाल्याचा फिल येत नाही; मला वाटतं तो फिल आज विठ्ठलने घेतला असावा. या आधीही तो कितीतरी चित्रपटातून टिव्हीवर येऊन गेलाय पण झी सारख्या बड्या बॅनरखाली मुख्य भूमिकेत झळकण्याची ही त्याची पहिलीच वेळ त्यामुळे त्याने आज काही तासातच करोडो हृदय जिंकली आहेत. दोस्ता असंच जिंकत राहा.

विशाल गरड
दिनांक : ११ जुलै २०२१