बायकोची ओटी पुस्तकाने भरण्यामागचा माझा उद्देश वाचन संस्कृतीला बळ देणे व पुस्तकांची संगत जुळावी हा आहे. असा नाविण्यपुर्ण उपक्रम प्रत्येकानेच राबवायला हवा. माणसाच्या मेंदुला खऱ्या अर्थाने विचारशील बनवण्याचे सामर्थ्य पुस्तकांत असते. मी जेवढं साडेतीन शक्तीपीठांना मानतो. तेवढंच साडेतीन अक्षरांच्या ‘पुस्तक’ या शब्दालाही मानतो कारण माझ्या आजवरच्या जडणघडणीत यांनी खुप मोठा वाटा उचलला आहे. इथुन पुढील आमच्या संसारात जेवढं महत्व चुल, भाकर आणि लेकरांचं असेल तेवढंच पुस्तकांचेही असेल. संसार फक्त पोट भरण्यासाठी आणि अपत्यप्राप्तीपुरता मर्यादित नसुन त्याला जर चांगल्या विचारांची सांगड मिळाली तर येणारी पिढी समृद्ध करण्याची क्षमता त्यात असते म्हणुनच हा अट्टाहास. आता दैनंदिन वाचनाने माझ्या विराचे विचार आणखीन विशाल होवोत हिच प्रार्थना.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ ऑगस्ट २०१८