प्रस्तावना म्हणजे जणू पुस्तकाचा आरसा, व्यक्तिमत्व विकासावर आधारित पुस्तक लिहिलंय म्हणल्यावर त्याला प्रस्तावना सुद्धा तितक्याच ताकदीच्या व्यक्तिमत्वाची हवी. पुस्तक लिहितानाच एक नाव डोळ्यासमोर होते ते म्हणजे सचिन अतकरे. आजवर सोशल मिडियावर या माझ्या दोस्ताचे थेट काळजातून पाझरलेले लिखाण मी वाचत आलोय. पाणी फौंडेशन, कोल्हापूरचा पूर आणि आता कोरोना कालखंडात त्याने त्याच्या लेखणीतून समाजाला सकारात्मकतेचे सलाईन लावण्याचे काम केले.

मी हट्ट धरल्यावर तो मला नाही म्हणूच शकत नव्हता याची खात्री होती मला. वुई विल हेल्प च्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मदत करण्याच्या आणि त्याच्या ऑफिसच्या व्यस्त कामातून वेळ काढून सचिनने पुस्तकाचा अर्क काढलेली सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. सच्या, याबद्दल तुझे आभार वगैरे काही नाही बरं कारण अजून सोबत राहून खूप काम करायचंय आपल्याला. हम्म बाकी पुस्तकात छापलेल्या तुझ्या शब्दांना मात्र मनापासून धन्यवाद. तुझ्या प्रस्तावनेने ‘व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय’ या पुस्तकाचे वजन वाढले. या आमच्या सचिनची पुस्तकाच्या पीचवरची अकरापानी खेळी अवश्य वाचा.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०