बदलत्या राजकिय ढंगात आता शुभेच्छा देण्याच्या पद्धतीसुद्धा बदलायला हव्यात. पहिले भिंती रंगवून शुभेच्छा असायच्या, मग डिजीटलवर आणि आता सोशल मिडीयावर. परंतु निवडणूकीच्या रणांगणात विजयी झालेल्या पदाधिकाऱ्याला जर त्या पदाची व स्थानिक संस्थेची माहिती देणारे पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या तर ? हाच विचार करून मी सुद्धा नुकतेच शेवाळेवाडीचे सरपंच म्हणून निवड झालेले माझे मित्र अशोकरावजी शिंदे यांना दिपक पुरी लिखित “ग्रामपंचायतीचा कारभार” हे पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. हार, फेटे, शालीवर खर्च करण्यापेक्षा एक छोटेसे पुस्तकही दिशा बदलू शकते. राजकारणात लोकांची मने जिंकण्यासाठी ह्रदय प्रेमळ असावं लागतं आणि निधी खेचुन आणण्यासाठी मेंदुत ज्ञान असावं लागतं म्हणजे मतदारसंघ सुजलाम सुफलाम होतो. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे आलेला निधी सुद्धा परत जातो. हे टाळण्यासाठी आपण ज्या संस्थेवर निवडून आलो आहोत त्या संस्थेची व पदाची सर्व कार्य कर्तव्य माहित असणे महत्वाचे ठरते. शासन देखील यासाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करते परंतु किती जन ते यशस्वी पुर्ण करतात यावर प्रश्नचिन्ह आहे.
सरपंच अशोकशेठचे हजारोंच्या हार तुऱ्यांनी सत्कार झाले परंतु त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीला बळकट बणवणारे एक सुंदर पुस्तक देऊन मी त्यांचा केलेला सत्कार त्यांना खुप भावला. आपणही नेतेमंडळींना स्वागतासाठी हार तुऱ्यांऐवजी पुस्तकेच न्यायला हवीत, क्योंकी पढेंगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ मे २०१८