लहाणपणी पेपरातले फक्त फोटो बघण्यात मजा यायची. नंतर आजोबा सांगायचे म्हणुन फक्त कुपन काढण्यापुरताच पेपरचा उपयोग असतो असे वाटायचे. जेव्हा मराठी वाचायला यायलं तेव्हा मोठ्या हेडींग वाचायलो. शाळेत असताना चिंटू, कार्टून्स आणि प्राण्यांचे वगैरे फोटो पेपरात दिसले की पहिल्यांदा नजर तिकडेच वळायची. नव्वी धाव्वीत ते सोडवलेल्या प्रश्नांचे सदर वाचायचे. नंतर काॅलेज जिवनात कोणत्या थेटरला कोणता पिक्चर लागलाय, हिरो हिराॅईनचे फोटो बघण्याचेच जास्त वेड. काॅलेज संपले डिग्री मिळाली की ‘पाहिजेत’ या काॅलमवर लक्ष असायचे. नोकरीच्या जागा कुठे निघाल्यात का ? कोणत्या एखाद्या कंपनीत जागा आहे का ? थेट मुलाखती कुठे आहेत ? हे पहायचोत.

एम्पीएस्सीचा नाद लागल्यावर मात्र अग्रलेख वाचायची सवयच लागली. पुढे नोकरी मिळाली आणि मग विरंगुळा म्हणुन राजकारण, बाॅलिवूड आणि क्रिकेट यासंबंधी बातम्या वाचायलोत. पेपरचा ढांचा अजुनही बदलला नाही तो लहानांपासुन थोरांपर्यंत सर्वांच्या उपयोगी पडेल असाच आहे. लहानपणी पेपरातल्या जाहिरातींची चिड यायची पण पत्रकारितेचा अभ्यास केल्यानंतर समजले कि या पेपरातल्या जाहिरातींमुळेच दहा-बारा रूपयाचा पेपर आपल्याला फक्त दोन-चार रूपयात मिळतो. बाकी पेपरच्या कागदाचे आणि हातांचे एक नाते आहे. या डिजिटल युगात आता पेपर मोबाईलच्या स्क्रिनवर आलाय पण तरीही एका हातात पेपर धरून दुसऱ्या हाताने चहाचा फुरका मारत मारत देश विदेशातल्या घडामोडी पेपरात वाचण्याची तलफ काय जिरत नाही.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ मे २०१९