एका आज्जीबाईची प्रतिक्रिया खास तिच्याच शैलीत

बोरगाव येथील व्याख्यान आटोपून युवकांच्या सेल्फीचा अभिषेक स्विकारत गाडीकडे निघालो तोच एका कट्ट्यावर बसुन व्याख्यान ऐकत बसलेल्या आज्जीबाईंनी मला हाक मारली. मी त्यांना नमस्कार करताच त्या बोलू लागल्या.

“आवं…काय भारी बोल्लासा तुम्ही,
शिवाजी महाराज कसं वागलं ते लय समजलं बघा
आयाबायावर बोलल्यालाव तर आम्हास्नी लय पटलं बघा. आवं आत्ताची पोरं आईबापाला सांभाळीत न्हायती पण आपल्या शिवाजी राजानं जिजाबाईला शेवटपतूर संभाळीलं व्हतं हे लय समजून सांगितलं बगा तुम्ही,
तुमचा कनाय परतेक सबुद ऐकु वाटत व्हता म्हणुन आम्ही बसलाव बगा हितं. आवं संप्पुचनी वाटायचं”
“अयऽऽपोरांनो ! ह्यंन्ला सारखं सारखं बुलवीत जावा रं.
आवं आम्हीबी भाकरी तुडून काबाडकष्ट करून लेकरं शिकीवली आज ती नौकरीलाबी लागल्याती ह्यंजं समाधान हाय. पण तुमचं भाषाण खरंच लय आवडलं बरंका”.

जसं जमल तसं दिलेली ही आज्जीबाईंची प्रतिक्रीया सुखावणारी होती. कट्ट्यावर बसलेल्या सर्व आज्जीमंडळींचा चरणस्पर्श करून मी पुन्हा गाडीकडे वळलो. प्रवासादरम्यान डोक्यात एक गोष्ट स्पष्ट झाली की; विचार तर सर्वांकडे असतात, वक्तृत्वही सर्वांकडे असते पण ते प्रभावीपणे मांडण्याचे सामर्थ्य मात्र अशा प्रतिक्रियांमुळेच तयार होते हे नक्की. धन्यवाद आज्जीबाई !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री १०:१५ वाजता
स्थळ : मु.पो.बोरगाव (कां) ता.बार्शी जि.सोलापूर