तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
संसारातली ही गती तुझ्याचमुळे, स्थैर्याची प्रगतीही तुझ्याचमुळे, एका दवबिंदूला समुद्र करण्याचे सामर्थ्य तुझ्याचमुळे, एका किरणाला सुर्य करण्याचे सामर्थ्य तुझ्याचमुळे. संपुर्ण जगाकडे पाहताना माझ्या हातात तुझा हात असल्याची जाणिव जग जिंकण्याचा आत्मविश्वास देते. तू शाश्वत आहेस, तू अनंत आहेस, तू शेवटपर्यंत आहेस, इथूनपुढच्या आयुष्यातल्या पटलावर तूझीच पाऊले उमटणार आहेत. भौतिक सुखांना ठोकरून माझ्या व्यक्तिमत्वावर ठेवलेला विश्वास एक दिवस या समाजात तुला अढळ स्थान मिळवून देणार आहे. आपला प्रवास संघर्षाचा आहे म्हणूनच त्यातून मिळालेलं यश हे चिरतरुण असेल अगदी तुझ्यासारखं.

आईच्या गर्भात असताना तिच्याकडून मिळालेला माझा श्वास लग्नाआधी फक्त एकट्याचा होता आता त्यात तुझा सहवास घुटमळतोय म्हणुनच तो सुरळीत सुरू ठेवण्याचा किंवा थांबवण्याचा अधिकार आईसोबत तुलाही प्राप्त झाला आहे. आई मुलाला पोटात पोसते तर बायको तिच्या डोक्यात पोसते. एकीने पुरूष म्हणून जन्म दिला तर दुसरीमुळे पुरूषत्व सिद्ध झालं. मने जुळली, शरिर जुळली आता श्वासांची माळ सुद्धा घट्ट जुळली आहे. संसाराच्या वेलीवर कधी खारट अश्रू येतील तर कधी गोड अश्रू येतील पण तुझ्या ओठावरचे स्मितहास्य असंच अबाधित राहू दे ! कधी चुलीवर भाकरी थापावी लागेल तर कधी फाईव्ह स्टार हाॅटेलात जेवावे लागले या शृंखलेत तुझ्यातली सामान्य स्री सदैव जिवंत राहू दे ! लव्ह यू बायको

तुझाच : विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०१९