बाहेरून मिळणाऱ्या कॉन्फिडन्सपेक्षा शरीराकडून मिळणारा कॉन्फिडन्स जास्त महत्वाचा असतो. सुदृढ आणि निरोगी शरीरात एक निरोगी मन वास्तव्य करीत असते. शरिर स्वास्थ्य बिघडले की मानसिक स्थिती सुद्धा बिघडतेच. पैसा कमवायला आपण जेवढा वेळ देतो त्याच्या दहा टक्के सुद्धा आपण त्या पैश्याचा उपभोग घेणाऱ्या शरीरासाठी देत नाहीत हे दुर्दैव. या जगात आपल्या शरीरसंपत्तीपेक्षा महत्वाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. ही संपत्ती सांभाळण्यासाठी श्रीमंत असो की गरीब, काळा असो की गोरा, पुरुष असो की स्त्री अशा सर्वांनाच व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. तेव्हा तुम्ही कुणीही असा पण चोवीस तासातला किमान एक तास रोज आपल्या शरीरासाठी नक्की द्या, त्या बदल्यात ते तुम्हाला खूप काही देऊन जाईल.

वरून वरून आपण सौंदर्य प्रसाधने वापरून कितिजारी सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या त्वचेची झळाळी आणि स्नायूंची शक्ती आपले शरिर आतून प्रदान करित असते. शरिराचे बाह्यांग पाहण्यासाठी आरसा असतो पण जर कधी अंतरंग पाहायची इच्छा झाली तर एखादं किलोमीटर पळून बघा मग समजेल आपला फिटनेस किती साथ देतोय. इथून पुढच्या सगळ्याच लढाया फक्त शक्तीवर लढायच्या नाहीत तर बुद्धीच्या बळावर लढायच्या आहेत हे मी जाणतो पण बुद्धीचा आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध असतो हेही नाकारून चालणार नाही. तन आणि मन निरोगी असले की धन येते आणि ते रोगी झाले की धन जाते तेव्हा निसर्गाने फुकटात दिलेली ही अब्जावधी रुपयांची शरिर नावाची प्रॉपर्टी प्रत्येकाने जोपासायलाच हवी.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २८ जून २०२०