दोन मोठ्ठे नेते एकत्र भेटले की त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो पण दोन कार्यकर्ते सोबत फिरले कि तो ‘फुटला’ असं हिणवलं जातं. दोन नेत्यांनी फुगडी धरली की नव्या युगाची नांदी म्हटलं जातं पण दोन कार्यकर्त्यांनी धरली की ‘मासा गळाला लागला’ असं छापलं जातं. दोन मोठ्ठे नेते खुर्चीशेजारी खुर्ची लावून बसले की कार्यकर्त्यांना भारी वाटतं पण दोन कार्यकर्ते खुर्चीला खुर्ची लावून बसले की नेत्यांना संशय येतो. काल भगवंताच्या शोभायात्रेतील सोपल साहेब आणि राजाभाऊ राऊत यांच्या फुगडीने मात्र कट्टरता जोपासून बसलेल्या बार्शीतल्या हरएक कार्यकर्त्याला यशवंतराव चव्हाणांनी घालुन दिलेल्या राजकारणापलीकडची आचार संहिता अनुभवायला लावली. कट्टरतेच्या पलिकडे सुद्धा मैत्री जिवंत असते फक्त हात पुढे करण्यावाचून ती अधूरी राहते. भगवंताने बोधले महाराजांच्या कानात सांगीतले आणि त्यांनी तालुक्यासाठी वेगवेगळे झटणारे हात ईतिहासात सर्वाधीक काळ काही सेकंदासाठी का होईना पण एकत्र आणले. फुगडी हा विषय राजकारणात असलेल्या आणि नसलेल्यांसाठी किती आल्हाददायी होता हे भर उन्हात गार वारा झोंबलेल्या अनेक उपस्थितांकडून समजला.

आमच्या बार्शी तालुक्यातील राजाभाऊ राऊत आणि दिलीपराव सोपल हे मुख्य आणि सर्वपक्षातले सर्वच मुख्य व उपमुख्य नेते मंडळी मला आदरस्थानी आहेत. तालुक्यात स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गेल्या तीन दशकांचे सोपल साहेबांचे प्रयत्न आणि गेल्या दोन दशकांचे राजाभाऊंचे प्रयत्न पराकोटीचे आहेत. म्हणुनच हे दोघेही पक्षाची वजाबाकी करूनही शिल्लक उरतात; यातच त्यांचे कर्तुत्व सिद्ध होते. माझे वडील राजकारणात असल्याने या दोन्ही नेत्यांना व त्यांच्या राजकारणाला जवळून अनुभवण्याचा योग आला. तुर्तास तरी मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही वा समर्थकही नाही परंतु माझ्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वपक्षीय नेतेमंडळींचा मला अभिमान आहे.

‘नेते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी’ ही म्हण बार्शी तालुक्याला लागू पडत नाही कारण इथले हे दोन्ही मातब्बर नेते कोणत्याही प्रसंगात कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात. तालुक्याच्या रूट लेवलला राऊत आणि सोपल हे दोन गट नटबोल्ट सारखे घट्ट बसलेले आहेत. हे नटबोल्ट धिल्हा करणारा पाना अजुनतरी म्हणावा तसा मिळाला नाही; तो मिळो ना मिळो परंतु तुर्तास तरी या फुगडीच्या निमित्ताने हा राजकीय नटबोल्ट विकासाच्या चाकांना असाच घट्ट बसुन राहावा जेणेकरून तालुक्याचा विकास जलद गतीने धावेल. शेवटी फुगडीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांना मला एवढंच सांगायचंय की, राजाभाऊ आणि सोपल साहेब, तुम्हा दोघांवर माझं व्यक्तीप्रेम आहे तेव्हा एकाच वेळेस तुम्हा दोघांना मतदान करता येईल असं काहीतरी करावं जेणेकरून एकाला संसदेत अन् एकाला विधानसभेत पहायला मलाच नाही तर माझ्यासारख्या लाखोंना आवडेल.

लेखक : बार्शीकरांचा पांगरीकर प्रा.विशाल गरड
दिनांक : २८ एप्रिल २०१८