बबनचा पहिल्याजुटचा शो बघाया मिळाला. आख्खा पिच्चर हुस्तोर कधी सुरू झाला आन् कधी संपला कळलच नाय. प्रिमियरला इंटरवल बिंटरवलची भानगड नस्ती त्यज्यामुळं आपुट पिच्चर सलग बगाया मिळाला. दोन तासाच्या आखंड पिच्चरमंदी भाऊराव कऱ्हाडेनी लई जीव वतलाय. गावाकडच्या माणसांला तर बबनमदल्या हारेक पात्रावुन जीव ववाळुन टाकू वाटलं आशी अॅक्टींग किलीया समद्यांनी. पिच्चरमदी सुरूवातीला पुलिस स्टेशनमदी साहेब पोट भरायला डबा उघडतंय आणि शेवटाला मानवी आत्याचाराची बळी ठरल्याली हिराॅईन तिज्या पोटातलं पाप कुंबडीचं आंडं फुटावं तसं भित्ताडावर आपटून संपीवती. सुरूवात आन् शेवट आंगावर काटा आणणारा हाय. मधल्या येळत दुधाच्या धंद्याचं वास्तव, गावातलं खत्रुड राजकारण, बैजू पाटलाची दारूगीरी, काॅलेजमदली मस्ती आन् भांडणं बगाया भेटत्याती. गावरान,ईरसाल बबन्या कोमलच्या माग फिरताना, बोलताना आणि टपकं खाताना दिसतंय तरीबी नाद नाय सोडत ‘हम खडे तो साला सरकार से बडे’ म्हणत म्हणत दुस्मानांशी दोन हात करत बसतंय.

पिच्चरचा हिरो जरी बबन आसला तरी समदी माणसं आपुणमत्त्याच बैजू पाटलाच्या पिरमात पडत्यात कारण ही भुमिका दस्तुरखुद्द डायरेक्टर भाऊरावनी वटीवल्यामुळं त्येला दोनशे टक्के न्याय मिळालाय. मला सुदा बैजू बेंद्रे पाटलाचं पात्र लयच झ्याक वाटलं. गावात राहत आसताना आपल्या तोंडात येणाऱ्या गावरान शिव्या जश्श्आन तश्श्या बबनमदी ऐकायला मिळत्यात्या. ती तसलं शिवी देताना बीप बीप ची भानगडं हितं आज्याबात नाय. ए ग्रेड तर ए ग्रेड गेलं झॅटमारी आशीच भुमिका डायरेक्टरनं घेतल्यामुळं समद्या शिव्या हितं ऐकायला मिळत्यात्या. हाँ आता आसल्या शिव्या ऐकायची सवय नसणाऱ्याला जरा कसनुसं वाटलं; पण बुरा ना मानो ये कलाकारी है आसं म्हणुनशान सुडुन द्या.

आमच्या बार्शीचा कलाकार अभय चव्हाण या चिकण्या हिरोनं व्हिलनगीरी भारी साकारली हाय, त्येज्यातला समदा मध हित बघाया भेटतंया. पिच्चरमदी त्येजा रोल जितका कडू हाय त्येज्याऊन जास्त मला आभ्याची अॅक्टींग जास्त ग्वाड वाटली. आमच्या पांगरीचा सुपुत्र आन् बबनचा लाईन प्रोड्युसर शुभम गोणेकरनंबी अॅक्टींगची झलक भारीच मारलीया. आन् व्हय व्हय महत्वाचं म्हंजी तब्बल पस्तीस तासाच्या फुटेजला कात्र्या लावू लावू फकस्त दोन तासाचा पिच्चर बनीवलेल्या बबनचा एडिटर प्रदिप पाटोळेचं सुद्धा लई कौतुक वाटतंय मला. हे तिघंबी जिगरी गँगमदली हैत आपल्या.

पडद्यामागच्या कलाकारांना भाऊंनी पडद्यावरबी चान्स दिलाय म्हणून योगेश डिंबळे,प्रमोद चौधरी, इंद्रभान कऱ्हे, संदिप बोरगे, संभाजी देवीकर हि माझी दोस्त गँग येगयेगळ्या पात्रात बबनमदी दिसली. यवग्याने नानाची भुमिका जग्वारमदी बसुन अरूण गवळीगत डॅशींग साकारली, तसंच भाऊसाहेब शिंदे यांनी बबनची भुमिका पायजे आशीच साकारली त्येला गायत्री जाधव व शितल चव्हानने चांगली साथ दिल्याली हाय, एकुनच समद्याची केमिस्ट्री, फिजिक्स आन् बायोलाॅजी चांगलं जमुन आलंया.

कंडोमचा किस्सा व मक्याच्या फडातली बबन्या आन् पप्पीची झकडपकड पोट दुखस्तोर हाशीवती. ह्यातच भरीसभर म्हणून बैजू पाटील जवा लिंबाच्या काडीला कोलगेट लावून दात घासतंय आणि सरीकडं दारू प्यायला शंभर रूपये मागतंय तवातर आतडी फाटूस्तर हासू वाटतंय. आता माझं लिव्हल्यालं वाचूनच हासत बसू नका थेट्रात जाऊन बबन बघून या आन् पुना तुमीच मला सांगचाल व्हय राव डिक्टो आसंच हाय.

बाकी शहरात राहिलेल्या माणसांला सुट्टयांत गावाकडं ययची गरज नाय तो फिल तुमास्नी बबन बगुन शंभर टक्के मिळलंच. पोट भरून हसायला, धिर गंभीर व्हायला, किव यायला, गुलाबी गोष्टी बघायला, फायटिंग पहाया, प्रेमाचं चाळं शिकाया, आन् ह्ये समदं बघीतल्यावर पिच्चरची लास्ट फ्रेम बगुन डोस्क्यात मुंग्या आणणारा ईच्चार घुसवुन घेण्यासाठी बबन नक्की बघा.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ मार्च २०१८