दिनांक २२ मार्च रोजी कोथरूड मधील सिटी प्राईड येथे बहुचर्चीत ‘बबन’ या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी उपस्थित होतो. चित्रपट सुरू झाल्यानंतर त्यातलं कथानक अगदी पहिल्या डायलाॅगपासुनच गावात घेऊन गेलं. गावाकडचं जगणं, वागणं आणि बोलणं भाऊंनी चित्रपटाप्रमाणे थेटराच्या बाहेर सुद्धा तितकंच काटेकोर जपलं याची प्रचिती प्रिमिअरच्या आधी बबनच्या सर्व कलाकारांची सनया आणि हालग्याच्या निनादात बैलगाडीतुन काढलेली मिरवणूक पाहूण आली. प्रिमिअरसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन कोणी मोठ्ठा सेलिब्रीटी वगैरे न आणता ‘ख्वाडा’ चित्रपट पाहिल्यानंतर ज्या प्रेक्षकांनी भाऊराव कऱ्हाडे यांना शंभर रूपये बक्षीस म्हणून दिले होते तेच शंभर रूपये त्यांनी बबनच्या निर्मितीसाठी वापरले व त्याची जाणिव ठेऊन त्या जोशी काका व मोहन मुंगी यांना बबनचा निर्माता करून टाकलं आणि प्रिमिअर सोहळ्याच्या मुख्य अतिथीचा मानही त्यांनाच देऊन फिल्म इंडस्ट्रीत नाविण्य घडवलं.

ग्लॅमरस दुनियेच्या झगमगाटात हा माणुस माणूसकी जपत चाललाय हिच गोष्ट भाऊंना आणखीन मोठ्ठ करेल यात शंका नाही. बबन चित्रपटाचे प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर, एडीटर, आणि सर्वच अॅक्टर माझे जिवाभावाचे दोस्त असल्याने या चित्रपटाविषयी जिव्हाळ्याचं नातं आहे. आज या सर्व दोस्तांचे काम पाहुण त्यांचा अभिमान वाटला.

माझ्या या दोस्तांनी बबनसाठी घेतलेली मेहनत खुप मोठ्ठीय त्याबद्दलची प्रतिक्रिया चार शब्दात आणि एका अलिंगनात संपणार नाहीच. बबन पाहिल्यापासुन डोक्यात विचारांचं काहूर माजलंय ते उतरवील आता सवडीनं परंतु तुर्तास तरी गावरान जिंदगीचा यंग्राळ अनुभव घेण्यासाठी तुम्ही बबन नक्की बघाच..

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २२ मार्च २०१८