हा आहे उस्मानाबाद तालुक्यातील बरमगाव बुद्रुक या गावचा युवक बालाजी ढवळे. पर्वा त्याच्या गावच्या इतिहासातले पहिलेच व्याख्यान मी पार पाडले. गोष्ट सहा सात वर्षा पूर्वीची आहे. बालाजी हा शिक्षणनिमित्त सोलापूर जिल्हा वसतिगृहात राहत होता. तिथेच रहाणारा बालाजीचा मित्र व आत्ताच्या प्रार्थना बालग्रामचा संस्थापक युवा समाजसेवक प्रसाद मोहिते याने वसतिगृहात माझे व्याख्यान आयोजित केले होते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सभागृह तुडूंब भरून गेले होते त्याच गर्दीत बसून माझे व्याख्यान ऐकलेल्या बालाजीने तेव्हाच  ठरवले होते की सरांना आपल्या गावाकडे व्याख्यानासाठी न्यायचे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या निमित्ताने पुण्याला गेला, तिथेच संसार थाटला पण तरीही गावाची ओढ होतीच.

काही दिवसांपूर्वी इकडे गावात जेव्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक झाली तेव्हा त्याने व्याख्यानासाठी माझ्या नावाची शिफारस केली. याआधी गावात कधीच व्याख्यानाचा कार्यक्रम झाला नसल्याने गावकऱ्यांनाही व्याख्यानाचा फारसा अनुभव नव्हता. वक्त्याची तारीख मिळेल का ? कार्यक्रमाला लोक जमतील का ? वक्ता चांगला बोलेल का ? नियोजन होईल का ? हे सारे प्रश्न त्यांना पडले पण बालाजी म्हणाला माझ्या गॅरंटी वर तुम्ही सरांना बोलवा. आपल्या गावाला ज्या विचारांची खरी गरज आहे ते विचार सर खूप प्रभावी मांडतील यावर माझा विश्वास आहे. बालाजीच्या विचारांना समितीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला आणि अवघ्या चार पाच दिवसात कार्यक्रमाचे देखणे नियोजन केले.

दिनांक २० मार्च रोजी, संध्याकाळी बरमगावात माझे व्याख्यान पार पडले. ग्रामस्थांना शिवचरित्रातले आजपर्यंत न ऐकलेले पैलू उलगडून सांगितले एवढेच नाही तर गावच्या आणि गावातील नव्या पिढीच्या भविष्यासाठी मौलिक विचार मांडले. व्याखान संपल्यावर सुमारे अर्धा तास माझ्या सभोवतालची गर्दी हटली नाही. प्रत्येकजण हातात हात घेऊन व्याख्यानाबद्दल प्रतिक्रिया देत होता. सेल्फीसाठी पोरांची झुंबड उडाली होती. लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून बालाजीच्या चेहऱ्यावर उमटलेले विजयी हास्य माझ्यासाठीही जिंकल्याची निशाणी होती.

हे सगळं मी का सांगतोय ? तर बालाजीने सुमारे सात वर्ष मला त्याच्या डोक्यात ठेवले, माझा विचार पोसला आणि संधी मिळताच त्या संधीचे सोने केले. आज गावातील प्रत्येक नागरिक बालाजीजवळ व्याख्यानाचे कौतुक करतोय. गावाला  चांगले विचार मिळाल्याने गावकरी समाधानी आहेत याचे सारे श्रेय बालाजीला जाते. जोवर अशा एका विचारशील युवकांच्या मेंदूत आमचं वास्तव्य आहे तोवर हजारो मेंदूत शिवचरित्र रुजवण्याची प्रक्रिया सुरूच राहील.

विशाल गरड
२२ मार्च २०२२