माझ्या ‘बाटुक’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज बार्शी येथे संपन्न झाला. गेल्या दिड दोन वर्षाचा गर्भकाल असलेलं हे पुस्तक अखेर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे औचित्य साधून प्रकाशित केलं. डॉ.बी.वाय यादव, आमदार राजेंद्र राऊत, मा.संजीव सोनवणे, मा.राजा माने, मा.विश्वास बरबोले यांच्या हस्ते बाटुकचे प्रकाशन झाले. या सर्व मान्यवरांच्या सुंदर भाषणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली तर मा.जयकुमार शितोळे, अभिनेता विठ्ठल काळे, खंडू डोईफोडे, सचिन वायकुळे, तात्या बोधे, शुभम मिसाळ, विशाल चिपडे यांच्या मनोगताने कार्यक्रमात रंगत आणली आणि आकांक्षा देशपांडेच्या सुंदर सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम छान बांधला गेला.

‘एका ठरवलेल्या चौकटीतले जीवन जगण्यापेक्षा युवकांनी साहित्य क्षेत्राकडे वळायला हवे, माझी पुस्तक निर्मिती म्हणजे माणसं जोडण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येकजण चौसष्ट कलांचा अधिपती असतो फक्त त्या स्वतः मध्ये शोधता आल्या पाहिजेत त्यातली एखादी जरी कला आपण आत्मसात केली तरी आपली ओळख अधोरेखित होते.’ हे विचार मी लेखकाच्या मनोगतात मांडले. यासोबतच माझ्या वक्तृत्वाच्या सुरुवातीच्या काळातील काही मजेदार किस्सेही श्रोत्यांना ऐकवले. कोविडच्या कारणामुळे अगदी मोजक्या श्रोत्यांना निमंत्रित केले होते तरीही सभागृह भरून गेले.

कर्नाटकी शाल, ग्रंथ आणि सागवाण वृक्ष देऊन प्रमुख पाहुण्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला तर पाहुण्यांच्या भाषणातून आणि श्रोत्यांच्या उपस्थितीतुन माझा सन्मान झाला. एका शब्दाला मान देऊन उपस्थित राहिलेल्या बार्शीतील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कला आणि साहित्य क्षेत्रातील प्रत्येक मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या माझ्या सर्व जिवलगांस मी धन्यवाद देतो. तुम्ही आज कार्यक्रमासाठी दिलेला वेळ हा विशाल गरड सदैव स्मरणात ठेवेल.

विशाल गरड
दिनांक : १ ऑगस्ट २०२१