यांचं रागावणं, डोळं वटारून बघणं, मारणं, शिव्या देणं हे सगळं म्हणजे छन्नी आणि हातोडे होते. आपल्या व्यक्तिमत्वाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आकार देण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हा बापाचा कितीही राग आला तरी तो राग डोक्यात कधीच नाही गेला.  लहानपणी बापाने पाठीवर मारलेला धपाटा मेंदू ठिकाणावर आणायचा जालीम उपाय असायचा. आमच्या पिढीने बाप अनुभवला तो असाच.

कधी मित्रांमध्ये बापाचा विषय निघालाच तर कुणाचा बाप किती व कसा मारतो याचे किस्से रंगायचे, यात बापाने पोराला मारण्याचे मुख्य कारण शाळा बुडवल्याचे असायचे. शाळेत असताना अभ्यासापेक्षा शिक्षकांची आणि वडिलांची भेट होऊ नये यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा असायची. चुकलो तर शिक्षा देणारा बाप संकट समयी मात्र पाठिशी सह्याद्री सारखा उभा ठाकतो मग त्याच्या पाठबळामुळे एव्हरेस्टला सुद्धा भिडण्याची ताकद येते.

विशाल गरड
दिनांक : २० जून २०२१