लग्ना आधीच्या स्वप्नात तू
मामाने फोडलेल्या सुपारीत तू
साखरपुड्याच्या साखरेत तू
लग्नाच्या मुंडावळीत तू

चुलीतल्या निखाऱ्यात तू
गॅसच्या फ्लेममध्ये तू
तू भाकरीत, तू भाजीत
तू चपातीत, तू भातात

घरातल्या केरसुनीत तू
तुळशीच्या पानात तू
ओट्यावरच्या रांगोळीत तू
देव्हाऱ्यातल्या करंडात तू

प्रेम ऊतू आलं तर ह्रदयात तू
भांडण झाले तर डोक्यात तू
आपल्या लेकरात तू
त्याच्या हसण्या रडण्यात तू

संसाराच्या प्रत्येक आनंदात तू
सुखात तू, दुःखात तू
तारुण्यात तू, उतारवयात तू
म्हातारपणाच्या काठीत तू

तू आहे म्हणून मी
मी आहे म्हणून तू
आणि आपण आहोत म्हणून ती

विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०२१

प्रिय विरा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !