कसलं भारी वाटतं ना जेव्हा तुमचा लहानपणीचा मित्र तब्बल वीस वर्षांनी तुम्हाला भेटतो. आज असच काहीसं घडलं इयत्ता आठवी पर्यंत माझ्यासोबत शिकलेला, एका बाकावर बसलेला लंगोटीयार महेश पुरी हा घरी भेटायला आला. घरच्यांची बदली झाल्यानंतर महेश पुरी आठवीपासूनच पांगरी सोडून गेला होता. बराच वर्षाचा काळ गेल्यानंतर फेसबूकमुळे आम्ही एकमेकांना भेटलो तिथून मग चॅटिंग वगैरे चालू झाली आणि आज अखेर माझ्या विनंतीला मान देऊन तो आवर्जून भेट घेण्यासाठी पांगरीला आला. घरी पाहुनचाराची औपचारिकता संपवून आम्ही लहानपणी ज्या शाळेत शिकलो ती शाळा पाहायला गेलो. त्या खोल्या, मैदान, बेंच पाहून गहिवरून आलं. शाळेत घालवलेले कित्येक क्षण झर झर डोळ्यासमोरून जात होते तासभराच्या गप्पांमध्ये कितीतरी आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन बऱ्याच दोस्तांच्या गाठीभेटी घेतल्या.

आमच्या लहानपणी आम्हाला तो शाळेतला हिरोच वाटायचा. त्याचं राहणं कसं एकदम टापटीप, त्याचं लिहिणं अतिशय सुरेख, त्याचं बोलणं एकदम शुद्ध आणि आम्ही आपले वड्या वगळीतले गावरान इरसाल भाषेतले म्हणूनच महेशकडे पाहून त्याचा आम्हाला हेवा वाटायचा. मी तर त्याच्या इनशर्टचा फॅन होतो. महेश सारखा इनशर्ट आम्हाला आजतागायत करता आला नाही. गुडगुडीत तब्येत, केस विंचरलेले, कडक इस्त्रीचा गणवेश, शर्टच्या खिशाला पेन, पॅन्टच्या खिशात रुमाल, दोन बंदाचे भारी दफ्तर त्यात व्यवस्थित ठेवलेले पुस्तके वह्या, सोनीचा कंपास, डब्बा आणि हातात वॉटरबॅग असा त्याचा रुबाब असायचा. त्याच्या वाहितला गृहपाठ बघून लिहिण्यात सुद्धा वेगळाच आनंद मिळायचा. एकूणच सांगायचं काय तर तो आमचा लहानपणीचा हिरोच होता. आपल्यालाही त्याच्यासारखा इन करता यावा. त्याच्यासारखं अक्षर काढता यावं, त्याच्यासारखं टापटीप राहता यावं असं नेहमीच वाटायचं. आज हे सगळं नव्याने आठवलं.

महेशच्या घरी जाऊन टीव्हीला जोडायची व्हिडिओ गेम खेळल्यावर लंय भारी वाटायचं. तेव्हा हातातल्या बंदुकीने टीव्हीतली माणसं मारता येतात हे फीलिंगच खतरनाक होतं. या वेडापायी मी आमच्या दादांना कितीदा तरी आमची जुनी व्हिडीओकॉनची टीव्ही बदलण्यासाठी हट्ट केला होता; जो हट्ट माझी मास्टर डिग्री झाल्यावर पूर्ण झाला. सांगतच बसलो तर अशा कितीतरी आठवणी सांगण्यासारख्या आहेत त्यातल्या कित्येक आठवणी तर काळाच्या कुपीत गडप झाल्या असतील. मोबाईल नव्हते त्या काळातली आमची मैत्री आज मोबाईलमुळेच पुन्हा जिवंत झाली. अब तो मिलना चलता रहेगा.

महेश सध्या निलंग्यात सेटल झालाय, एम.बी.ए नंतर काही वर्ष नोकरी करून आता स्टॉक एक्स्चेंजचा व्यवसाय करतोय. माझ्या ब्लॉगचा तो नियमित वाचक आहे. आपण असं काही काम करावं की मित्रांना त्याचा अभिमान वाटावा. आम्हा एकमेकांना तो वाटतोय हेच आमचं यश आहे. आज महेश पुरी भेटायला आला म्हणून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देता आला. बाकी प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक महेश पुरी असतोच.

धन्यवाद पुरी, तुझ्या आजच्या भेटीमुळे गेली कित्येक वर्ष मनातल्या कोपऱ्यात चिटकलेले शब्द निखळून खाली आले.

विशाल गरड
दिनांक : २३ ऑगस्ट २०२१