कुणी बेड देता का बेड, कोरोनामुळे श्वास घ्यायला अडचण येत असलेल्या रुग्णाला कुणी ऑक्सिजनचा बेड देता का बेड. होय, सद्यस्थितीला हेच सत्य आहे आणि अशी कितीही आर्त हाक मारली तरी बेड मिळेल याची अजिबात शाश्वती नाही. अक्षरशः माणसे घरीच मरायला सोडून द्यावी लागतील एवढी भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता ही स्थिती वरचेवर अजून भयानक होणार आहे हे सांगायला कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही. ज्या इटलीची आरोग्य व्यवस्था जगात भारी म्हणून लौकीक होता तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे आपण डोळ्यांनी पाहिले आहे मग आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे हे माहीत असतानाही आपण कुणाच्या जिवावर आपला जीव बाहेर हिंडायला सोडतोय ? याचा विचार व्हावा.

फक्त लॉकडाऊन करणे हा पर्याय नाहीच तर योग्य काळजी घेऊन आपण जगणे हाच एक पर्याय आहे. पन्नाशी ओलांडलेल्यांनी तर किमान लस येईपर्यंततरी घर सोडू नये. इ पास रद्द झालेत, दळणवळण चालू झालंय, हॉटेल लॉज सुरू झालेत या सगळ्या गोष्टींचा उपयोग गरज पडेल तेव्हाच करा मौज म्हणून नको. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थापेक्षा सध्या कोणताच मुद्दा महत्वाचा नाही आणि असूही नये. आज जे दुसऱ्याच्या उंबरठ्यावर घडतंय तेच जेव्हा आपल्या उंबऱ्याजळ येऊन उभे राहिल तेव्हाच या लिखाणाचे महत्व पटेल तोपर्यंत हाही लेख शे पाचशे लाईक आणि पाच पन्नास कमेंटचा मोहताज असेल. आता माणसे वाचवणे हाच एक अजेंडा असायला हवा एवढेच वाटते. हे वर्ष फक्त जिवंत राहण्याचे आहे. शरीरातील अवयवांना माहीत नाही तुम्ही लखपती आहात, करोडपती आहात का गरीब आहात त्यांचे कार्य सर्वांसाठी सारखेच आहे तेव्हा त्यांची काळजी घ्या ते तंदुरुस्त तर आपण तंदुरुस्त नाहीतर स्मशान वाटच बघतंय.

● महत्वाच्या नऊ गोष्टी 👇🏾

१) ताप, खोकला अंगावर काढू नका. जर तसे केले तर विषाणूचा संसर्ग थेट फुफ्फुसापर्यंत जाईल आणि श्वास घ्यायला त्रास होईल. ग्रामीण भागातील लोक नेहमीचा सर्दी खोकला आहे म्हणून दुर्लक्ष करित आहेत.

२) खोकला सुरू झाला की विलगिकरण पाळा, तोंडाला मास्क आणि हातावर सॅनिटायझरची सक्ती करून घ्या ज्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही.

३) तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ऑक्सिजन बेड उपलब्ध असणार नाही. सध्या सगळीकडेच भयानक परिस्थिती आहे. सर्व कोविड सेंटर हाऊसफुल्ल आहेत. ही वेळ येऊच नये म्हणून खबरदारी घ्या.

४) तुम्हाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडेल इथपर्यंत परिस्थिती बिघडू देऊ नका. नेहमीचा खोकला आणि फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे येणारा खोकला यात फरक असतो तो वेळीच समजून घ्या.

५) तुमची रॅपिड कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे पण तरीही श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तीन दिवस क्वारँटाइन होऊन RT-PCR स्व्याबच्या रिपोर्टची वाट बघत न बसता तात्काळ डॉक्टरच्या सल्ल्याने HRCT Of Lungs हा एक्सरे काढा या द्वारे अचूक निदान होते.

६) HRCT मध्ये जर निमोनिया किंवा कोविड संसर्ग आहे असे समजले तर तात्काळ ऍडमिट होऊन उपचार सुरू करा तुम्ही दहा दिवसात बरे व्हाल. अन्यथा दिर्घकाळ व्हेंटिलेटरवर राहावे लागेल.

७) आत्ताच्या परिस्थितीत प्रत्येक गावात किमान दोन ऑक्सिजन बेडची गरज आहे. हिवाळी अधिवेशनात असा एखादा ठराव होणे अत्यंत महत्वाचे आहे.

८) जर योग्य वेळी उपचार मिळाला नाही तर जगातली सगळी संपत्ती सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि जर वेळेत खबरदारी घेतली तर अवघ्या दहा दिवसांच्या कोविड ट्रिटमेंटने तुम्ही ठणठणीत बरे व्हाल.

९) वेळेत खबरदारी घेतली तर स्वतःला वाचवू शकता जर का वेळ घालवली तर मृत्यूशी भेट होईल. विचार करा, काळजी घेऊनच बाहेर पडा, लक्षणे दिसताच डॉक्टरशी संपर्क साधा. जान है तो जहान है

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०५ सप्टेंबर २०२०