हिच संधी आहे खासदार आणि पंतप्रधान निवडण्याची. हिच संधी आहे लोकशाही बळकट करण्याची. हिच संधी आहे हुकुमशाहीच्या जबड्यातुन लोकशाही बाहेर काढायची आणि लोकशाहीला गाढून हुकुमशाही लादून घेण्याची सुद्धा आता काय पाहिजे आणि काय नको हा सारासार विचार करूनच मतदान करण्यासाठी बाहेर पडा. मतदान न करता राजकिय पुढाऱ्यांवर व त्यांच्या धोरणांबद्दल चांगले वाईट बोलण्यापेक्षा तुमची भुमिका मतदानातुन व्यक्त करा. गेल्या पाच वर्षात घसा ओरडुन आणि फेसबुक, व्हाॅट्सअॅपवर पोस्टी टाकून जे साध्य होत नाही ते आज फक्त एक बटन दाबून साध्य होणार आहे, तेव्हा लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभाग नोंदवा आणि अवश्य मतदान करा.

मतदान केंद्रात गेल्यावर प्रचार, जाहिराती, सभा, वर्तमानपत्रे, टि.व्ही, सोशल मेडीया या सगळ्या गोष्टी उंबऱ्याबाहेर सोडून मशिनसमोर उभारल्यानंतर तुमच्या मनाला विचारा कुठलं बटन दाबायचंय. माझ्या मते स्वतःचे मत आपल्या स्वतःला तयार करता आले पाहिजे ते कुणा दुसऱ्याने तयार करू नये. समाजात माणूस म्हणुन जगत असताना तुम्ही गेल्या पाच वर्षात जे अनुभवले, भोगले, सोसले किंवा लाभार्थी झालात त्या सर्वांची बेरीज वजाबाकी करून तुम्हाला योग्य वाटणाऱ्या उमेदवारालाच मत द्या. समजा एकही उमेदवार लायक वाटत नसेल तर सरळ ‘नोटा’ बटन दाबा पण नोट मिळाली नाही म्हणून ‘नोटा’ दाबू नका बरं. तुमच्या एका मताचे मुल्य भारताच्या अर्थसंकल्पाएवढं मोठं आहे हे ध्यानात घेऊन मतदान करा. सर्व पक्षांना, उमेदवारांना आणि मतदारांना निवडणुकीच्या हार्दीक शुभेच्छा !

वक्ता तथा लेखक : मतदार विशाल गरड
दिनांक : १८ एप्रिल २०१९

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here