कडेवर लेकरू घेऊन ती चालत होती. अचानक थांबली; एका हातातली बादली खाली टेकवली, गुडघ्यात थोडंसं वाकुन कडेवरचं लेकरू रोडवर झोपवलं आणि भांडी असलेली ती टोपली दोन्ही हातांनी अलगद खाली उतरवत ढिल्ली झालेली गाठ तीने घट्ट बांधली. सिमेंट रोडवरची तापलेली धूळ पोळत असेल त्याला पण साधं ऊंई नाही ना चुंई नाही केलं लेकरानं. हात पाय हलवत मस्त हसत हसत आईकडे एकटक पाहत होतं ते. प्रतिकुल परिस्थिती माणसाची प्रतिकार क्षमता वाढवते याचा साक्षात्कार झाला.

या स्वाभिमानी स्रिया परिस्थितीशी हार न मानता स्वतःचे दुकान डोक्यावर घेऊन, लेकरू पाठीशी बांधून गावातल्या गल्ली बोळातुन फिरून ” एऽऽ मोडीवर भांडेऽऽऽ” अशा आरोळ्या देऊन भांडी विकतात, त्याच पैशावर स्वतःचा प्रपंच चालवतात. साला दोन टाइमाचे जेवन घरी बसुन मिळणाऱ्यांनाच आजकाल जास्त टेंशन आहे असं दिसतंय. रोज कष्ट करणाऱ्याला टेंशन घ्यायला वेळंच कुठे असतो ?
हॅट्स ऑफ मदर इंडिया.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २२ ऑक्टोंबर २०१९

(टिप : मला माहित आहे पर्वा राजकीय पोस्टच्या धुळवडीत ही सामाजिक पोस्ट गुडुप होऊन जाईल पण पर्वा येणाऱ्या नविन सरकारकडून या खऱ्या खुऱ्या वंचित घटकासाठी नक्कीच अपेक्षा असतील म्हणुन हा लेखप्रपंच.)