किती मनिषा असतील तिच्या, अक्षरशः चुरगाळल्या लिंगपिसाटांनी. निर्भया,श्रद्धा,असिफा,प्रियांका आणि आता हाथरस (उत्तर प्रदेश) येथील मनिषावर झालेला अत्याचार पाहून आता असं वाटतं की अशा निषेधाच्या पोस्टचे टेम्प्लेट तयार करून ठेवावे. फक्त पिडीत मुलीचे नाव, गांव आणि अत्याचार करणाऱ्यांची संख्या बदलायची झाली निषेधाची पोस्ट तयार. आता आधी सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्ट ट्रेंडिंग मध्ये याव्या लागतात मग तेव्हा कुठे मेन स्ट्रीम मीडियात त्या दाखवल्या जातात. माणसे सोडा ओ इथली सिस्टीम सुद्धा बलात्कार करते आपल्या भावनांवर याचे दुःख वाटते. इथे ‘टिआरपी’ हेच एक सत्य आहे बाकी बलात्कार, मर्डर, आत्महत्येच्या बातम्या चघळणे एक टास्क आहे.

एखाद्या घटनेला जाती, धर्म, वर्ण, श्रीमंत गरिब यात वर्गीकरण करणे रुटीन गोष्ट होऊन बसली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःच्या मुलीचा असा विटंबना केलेला मृतदेह जेव्हा तिचे आई वडील पाहतात तेव्हा त्यांच्या तोंडून निघणाऱ्या हुंदक्याच्या आवाजाला आणि डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंना जात धर्म नसतोच. या जगात दोनच जाती आहेत सुख व दुःख आणि आपण सगळेच या जातीत मोडतो. वेळेनुसार या जाती आपोआप बदलतात. मनीषाला मारणाऱ्यांबद्दल मी कितीही वाईट चिंतले तरी ते आणखीन काही वर्षे तरी जिवंत राहणार आहेत. तरीही त्यांची जगण्याची इच्छा पूर्ण होऊ नये एवढीच मनिषा. भावपूर्ण श्रद्धांजली.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३० सप्टेंबर २०२०