यश मोजण्याच्या अनेक पट्ट्या असतील, टप्पे असतील किंवा पद्धती असतील परंतु आपण ज्या महाविद्यालयात शिकलो, तेच कॉलेज जेव्हा तुम्हाला त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून इमाने इतबारे आमंत्रीत करतात तेव्हा आपण निवडलेल्या क्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीचा तो सर्वोच्च सन्मान असतो. मी नाशिकच्या क.का.वाघ कृषी महाविद्यालयाचा २००५ च्या पायोनीअर बॅचचा माजी विद्यार्थी आहे. आयुष्यातले पाहिले भाषण ज्या रंगमंचावर केले त्याच रंगमंचावर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थितांना संबोधित करेन. अनेक कालाप्रकारात मिळवलेले पारितोषिके ज्या रंगमंचावर स्विकारली त्याच रंगमंचावरून मी विजेत्यांना पारितोषिके प्रदान करिन. खरंतर स्टेज समोरील गर्दीतून व्यासपीठावरील चीफ गेस्ट पर्यंतचे अंतर जरी कमी असले तरी तिथपर्यंत पोहचण्याचा प्रवास मात्र चौदा वर्षाचा आहे. खूप मोठ मोठ्या संस्थांनी आजवर मला निमंत्रित केलंय त्याचा आनंद आहे पण आज माझ्या कॉलेजने दिलेला हा मान अभिमानास्पद आहे. आता ३० जानेवारीला डोंगराएवढ्या आठवणींना काही मिनिटांच्या मनोगतात मांडणे कसरतीचे ठरणार आहे हे नक्की.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड