माझ्यावर आईहून जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आज्जी होती. दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ती मला पोरकं करून गेली. मायेचा समुद्र जणू तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखा चर्रर्र करून आटून जावा तशी ती निघून गेलीये पुन्हा कधीच न परत येण्यासाठी. पांगरीच्या निलकंठेश्वरावर तिची प्रचंड श्रद्धा होती, जोवर पायात त्राण होता तोवर प्रत्येक सोमवारी ती निलकंठेश्वराला जायचीच. स्वर्गाच्या दिशेने अखेरचा प्रवासही तिने सोमवारीच केला हा योगायोग नसून जणू महादेवानेच तिला महाशिवरात्री साजरी करायला स्वर्गात निमंत्रित केलं असावं एवढी ती विलक्षण घटना होती.

दिड वर्षापूर्वी बापू गेले तेव्हापासूनच आज्जीची तब्बेत कमी जास्त होत होती. तेव्हाही तिने बापू गेल्याचे दुःख पोटात ठेवून आम्हाला धीर दिला पण आतून ती खचली होती कारण सकाळी लवकर आंघोळ झाल्यावर जेव्हा ती कपाळाला मेन लावून त्यावर कुंकू लावायला बसायची तेव्हा पाच दहा मिनिटे तरी लागायची पण बापू गेल्यापासून तिजी तिलाच आरशात बघायला नकोसं व्हायचं. कपाळाचे भारदस्त कुंकू हे जुन्या बायांचा सर्वोच्च दागिना असायचा तोच हरवला तर त्यांचे मनही हरवून जातं असंच काहीसं आज्जीचं झालं आणि गेल्या दिड वर्षात ती पुरती थकून गेली. तरूण वयात शेतात प्रचंड कष्ट केलेली आज्जी वयाची ऐंशी पार करुस्तोवर तंदुरुस्त होती आमच्या जन्मापासून ती कधी आम्हाला म्हातारी वाटलीच नाही, अंगावर इरकल होती बस्स एवढीच तिच्या म्हातारपणाची काय ती निशाणी. कामाला म्हणलं तर आईच्या खांद्याला खांदा लावून राबायची.

आज्जीच्या हातचे पिठलं, आंब्याची चटणी, टोमॅटोची चटणी, कडी, ताक या माझ्या प्रचंड आवडीच्या गोष्टी. घरी केलेली एखादी भाजी कधी नाही आवडली की आज्जी लगेच मला काहीतरी करून खाऊ घालायची. घरातल्या लहान लेकरांची काळजी घेणारं ती एक विद्यापीठ होती. इनबिन दुसरी पर्यंत शिकून अडाणी राहिलेली आज्जी नंतर मात्र स्वयंप्रयत्नातून साक्षर झाली, वाचायला शिकली. भजनाची आवड असल्याने तिने बरेच अभंग आणि गवळणी तोंडपाठ केल्या. किर्तन, भजन, हरिपाठात ती रमायची. देवपूजा आणि तुळशी माळेचा जप तिने अखंड ठेवला. घरातल्या कुणीही घराचा उंबरा ओलांडला की तो परत येईस्तोवर आज्जीचा जीवात जीव नाही राहायचा. तिचं सगळं आयुष्य कष्ट करण्यात आणि लेकरांना, नातवांना जीव लावण्यातच गेलं.

वैजियंताबाई नावाचं आमचं इरकलीतलं विद्यापीठ जरी आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरी तिच्या संस्काराची शिदोरी आम्ही टिकवून टिकवून खाणार आहोत. गरड घराण्याच्या तीन पिढ्यांवर संस्कार केलेल्या या स्त्रीच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. माझ्या कादंबरीला तिचा दोन वर्षांचा सहवास लाभला हे माझ्या पोरीचं भाग्यच. आता तिच्या आठवणी ह्याच  ठेवा आहेत ज्या जपल्या जातील आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत. आज्जे तुझी लै आठवण येते, साश्रु नयनांनी तुला भावपूर्ण श्रद्धांजली.

विशाल गरड (वैजियंताबाईचा नातू)
२ मार्च २०२२, पांगरी