खरं तर हे पुस्तक लिहिणे म्हणजे एक दिव्यच होते. लिहायला बसल्यावर पहिले दहा बारा दिवस तर नेमकी सुरवात कशी करावी आणि शेवट कसा करावा हाच विचार करण्यात गेले. मग स्वतःच्या अनुभवात जरा डोकावून पाहिले तेव्हा खरी मेख इथेच सापडली, पेन उचलला आणि लिहीत गेलो. हजारो लाखो जनांचे हे स्वप्न साकार होईल असं काहीतरी शाश्वत, अभ्यासपूर्ण तरीही तितकंच सहज,सोपे आणि थोडक्यात लिहायचे; असे गेली खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होते. अखेर लॉकडाऊनचा सदुपयोग करून मिळालेला वेळ पुस्तक लेखनात सार्थकी लावला आणि माझेही ते स्वप्न पूर्ण झाले.

हे पुस्तक वाचण्याची तुमची इच्छा आणि पुस्तकाचे प्रकाशन यात जास्त अंतर न ठेवता या जुलै महिना अखेरपर्यंत ते तुमच्यापर्यंत ‘सुरक्षित’ पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. आजवर जो प्रतिसाद तुम्ही माझ्या ह्रदयांकित, रिंदगुड आणि मुलूखगिरी या पुस्तकांना दिला त्यापेक्षा जास्त प्रतिसाद “व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय” या पुस्तकाला द्याल याची खात्री आहे. अतिशयोक्ती नाही पण तितकं दर्जेदार झालंय म्हणून म्हणतोय. बाकी पुस्तकाला प्रस्तावना कुणाची ? त्याचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ कसे ? त्याची किंमत किती ? प्रकाशन केव्हा ? कुठे ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरेही लवकरच देईन तूर्तास माझ्या कुंचल्यातून साकारलेली ही पुस्तकाच्या शिर्षकाची कॅलिग्राफी; डोस्क्यात फिट्ट करून ठेवा !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २० जुलै २०२०