मला बारावीच्या निकालाची खूप उत्सुकता लागली होती. त्यावेळी बारावी परिक्षेसाठी माझा नंबर महाराष्ट्र विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आलता. मी ज्या वर्गात परिक्षा दिली त्या खिडकीतुन मामाचा पुतळा स्पष्ट दिसायचा. काॅलेज जीवनात कर्मवीर जगदाळे मामांच्या विचारांचा पगडा प्रचंड होता. एखादा प्रश्न येईना म्हणुन ईकडे तिकडे डोकावून जरी पहायचं म्हणलं तरी मामांचा पुतळा बघून हिम्मत होत नव्हती. जेवढं डोक्यात होतं तेवढंच कागदावर काळं केलतं. चिट्टी चपाटीचा विषयचं नव्हता. जी पण काही मार्क पडणार होती ती पतंजलीच्या सर्व प्रोडक्टपेक्षा प्युवर पडणार होती.

निकालाच्या दिवशी सकाळी लवकर उठुन एस.टी ने बार्शीला आलो. त्यावेळी इंटरनेट काही मोजक्याच ठिकाणी असायचे, त्यापैकी पांडे चौकातल्या जागृती पेन डेपोत दहा रूपयाला निकाल सांगीतला जायचा. एका चिठ्ठीवर आपला परिक्षा क्रमांक लिहायचा आणि ती चिठ्ठी दहा रूपयाच्या नोटेसह दुकानदाराकडे द्यायची. प्रचंड गर्दीतुन ती चिठ्ठी नाव पुकारून दिली जायची. कुणी जल्लोश करायचं, कुणी तीथंच रडायचं तर कुणी चिठ्ठी पाहिल्या पाहिल्याच फाडुन टाकायचं. मी मात्र ती चिठ्ठी तीथंच न उलगडता गुपचुप खिशात घालुन थेट भगवंत मंदीर गाठलं. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन हात जोडले, डोळे मिटले, मग हळुच शर्टच्या वरच्या खिशात हात घालून ती चिठ्ठी आणि डोळे सोबतच उघडले. चिठ्ठीवर लिहिलं होतं “विशाल विजय गरड ६२.१७” बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयातुन फर्स्ट क्लासमध्ये बारावी सायन्स पास झालो. मार्क कमी का जास्त हा विषयच नव्हता पास झाल्याचा आनंद बोर्डात आलेल्या मुलापेक्षा जास्त होता.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० मे २०१८