मागच्या महिन्यात अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळासाठी मी ऑनलाईन व्याख्यान दिले होते. आज त्यांनी त्या व्याख्यानाचे स्वेच्छा मानधन पाठवले. हे माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा डॉलर मध्ये मिळालेलं बक्षीस आहे. लहानपणी अमेरिकेची नोट जरी कुणाकडे असली तरी ती बघायची प्रचंड उत्सुकता असायची. मी शाळेत असताना आमच्या एका नातेवाईकांकडून मिळालेली ती नोट मी कुतूहल म्हणून पाकिटाच्या आत जपून ठेवली होती. ती आजही तशीच आहे. फक्त वक्तृत्वाच्या जोरावर कधी डॉलर मिळतील अशी अपेक्षा केली नव्हती. भविष्यात अजून डॉलर कमवेल पण आज मिळालेल्या या पहिल्या डॉलर्सचा आनंद आयुष्यभर स्मरणात राहील. तसेच या डॉलरपेक्षा पांगरी सारख्या खेडेगावात बसून हे डॉलर देणारी माणसे कमवू शकलो याचा अभिमान वाटतोय.

आर्थिक विवंचना कुणाला नसते. या लॉकडाऊनमध्ये मलाही ती भासली. आमचे संस्थाध्यक्ष सोनवणे सर आणि काही मित्रांच्या मदतीमुळे अशा लॉकडाऊनच्या काळातही “व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय” हे पुस्तक छापू शकलो अन्यथा ही खर्चिक गोष्ट अशक्य होती. आपले काम प्रामाणिक आणि लोकहिताचे असेल तर नियती मदत आपोआप पोहोचवते म्हणतात ते खरे आहे. डॉलर स्वरूपात मिळालेली मानधनाची रक्कम आता मला पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापायला उपयोगी पडेल. भविष्यात जेव्हा माझ्या पुस्तकाच्या सर्व प्रति विकतील तेव्हा त्यातून मिळालेली नफ्याची संपुर्ण रक्कम विविध उपक्रमांतर्गत पुन्हा समाजालाच द्यायची आहे ही मी स्वतःच स्वतःशी केलेली कमिटमेंट आहे जी आजवर पाळत आलोय आणि पुढेही पाळली राहील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०