हि मुंबई स्वप्नात हवा भरते. डोळ्याला मोठ मोठ्या गोष्टी पहायची सवय लावते. लोकलच्या गर्दीत स्वतःची ओळख विसरून जायला भाग पाडते. हि धावते, वाहते पण थांबत कधीच नाही. पाऊस असो वा थंडी ती घाम काढतेच. हि मुंबई समृद्ध होते कष्टकऱ्यांच्या घामांनी, फुटपाथांनी, लोकलच्या जाळ्यांनी, समुद्रांच्या लाटांनी, रेल्वेस्थानकांशेजारील बाजारपेठांनी, ऐतिहासिक ईमारतींनी, झोपडपट्ट्यांनी, पुढाऱ्यांनी, पत्रकारांनी आणि पोलिसांनी.

मुंबई आपल्या महाराष्ट्राची म्हणुन फार अभिमान पण तिथं जगताना ती फक्त महाराष्ट्राचीच असल्याचे अनुभव जरा कमीच पहायला मिळतात. हि मुंबई आता फक्त शरिराने महाराष्ट्राची आहे पण मनाने ती आता संपुर्ण देशाची झाली आहे. कुणी तिला तोडण्याचा प्रयत्न करतोय तर कुणी तिला जोडण्याचा प्रयत्न करतोय. पैसे कमवायचा कारखाना सगळ्यांनाच हवाहवासा वाटतोय. पण कुणी काहीही करूद्यात मुंबईच्या जन्मदाखल्यावर लिहिलेली ‘मराठी’ ही जात कुणीच पुसू शकत नाही. कारण ती १०५ हुतात्म्याच्या रक्ताने लिहिली गेली आहे.

मी मुंबईचा रहिवाशी नाही पण का कुणास ठाऊक हि मुंबई लोहचुंबकासारखी आकर्षीत करत आहे. कदाचित माझ्यातल्या कलाकारावर ती भाळली असावी. पण मी मात्र तिच्यावर पांगरीत राहुनच प्रेम करणार. आज जरी अनोळखी म्हणून मुंबईच्या रस्त्यावरून फिरत असलो तरी एक दिवस हिच मुंबई मला तिच्या खांद्यावर घेईल. तो क्षण जगताना आजचे हे क्षण पाठिशी असावे म्हणुनच हा अट्टाहास. बाकी मुंबईत राहून काही नाही पाहिलं तरी चालतंय पण स्वप्न पहायला विसरू नका कारण आपल्याला आज आभाळाएवढी वाटणारी कितीतरी माणसं इथेच स्वप्न पाहून आभाळाला टेकली आहेत. क्योंकी “बडा होने का रास्ता ईसी मुंबईसे जाता है बाबू”.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ सप्टेंबर २०१९
स्थळ : मुंबई