आज दुरदर्शन सह्याद्री वाहिनीवर माझी मुलाखत रेकाॅर्ड झाली. लहानपणापासुन माहित असलेली टि.व्ही वरची सह्याद्री ही गोरगरिबांची पहिली वाहिनी आहे. आज जरी सगळ्यांच्या घरावर डिश टिव्हीच्या छत्र्या लागल्या असल्या तरी याआधीच्या तब्बल चार दशकापासुन दुरदर्शननेच आपली मनोरंजनाची आणि बातम्यांची भूक भागवली आहे. भारत सरकारच्या या वाहिनीवर मुलाखत होणे म्हणजे एक विशेष सन्मानच असतो. माझ्यासारख्या ग्रामिण भागात राहून कला अणि साहित्याची मुशाफिरी करणाऱ्या तरूणाची; दुरदर्शनच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम निष्पादक संजय कर्णिक साहेबांनी दखल घेत मला आज मुलाखतीसाठी निमंत्रित केले.

आयुष्यात पहिल्यांदाच सह्याद्रीवर मुलाखतीसाठी जात होतो. माईकसमोर बोलण्याचा एवढा मोठा अनुभव पाठीशी असतानाही शुटिंग स्टुडीओत सभोवताली असलेल्या मोठ मोठ्या व्हिडीओकॅमेऱ्यांनी आणि चोहोबाजूच्या लाइट्सने थोडं दडपण आलं होतं. परंतु मुलाखत प्रत्यक्षात सुरू झाल्यावर मात्र निवेदक ज्ञानेश्वर जाधवर सारख्या पट्टीच्या मुलाखतकाराकडून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना मी दिलखुलास उत्तरे दिली. एका मुलाखतीमागे दुरदर्शनचा संपुर्ण स्टाफ काम करत असतो. दिलेल्या शेड्युलमध्येच मुलाखत पुर्ण करावी लागते. जास्त रिटेक वगैरे चालत नाहीत. माझी मुलाखत वन टेक मध्ये झाल्याने सर्व स्टाफने कौतुक केले.

मुलाखत खुप सुंदर झाली आहे. आजच्या या मुलाखतीत दुरदर्शनने माझ्या सर्व कलाप्रकारावर प्रकाशझोत टाकलाय. कमी वेळेत माझ्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केलाय. आता त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार लवकरच ती प्रसारीत होईल. कधी आणि केव्हा हे लवकरच सांगेल. परंतु आजपर्यंत खूप महान आणि थोर व्यक्तींच्या मुलाखती मी ज्या सह्याद्री वाहिनीवर पाहिल्या त्यावरच स्वतःची मुलाखत पाहण्याचा क्षण माझ्यासाठी व माझ्या कुटुंबियांसाठी खरंच खुप अभिमानाचा असणार आहे. आज सह्याद्री वाहिनीने एका कलाकाराच्या कलेला दिलेला राजाश्रय भविष्यात ईतिहास घडवेल हे नक्की. वन्स अगेन थँक्स टू कर्णिक सर, तनुजा ताई अॅण्ड टिम सह्याद्री.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०६ ऑगस्ट २०१९