काल प्रवासात असताना कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व माझी विद्यार्थीनी कु.सई टोणगे हिचे वडील श्री.सतिश टोणगे यांचा फोन आला होता की “सर उद्या आमच्या सईचा वाढदिवस आहे तेव्हा भेटायला येऊ का? मी म्हटले हो या मी आहे उद्या काॅलेजवर. सतिश टोणगे हे कळंब तालुक्यात बप्पा नावाने प्रसिद्ध आहेत. विषय कोणताही असो बप्पांची लेखणी सदैव तळपत असते. चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडत असतानाच प्रेम या विषयावर एखाद्याची डबल पी.एच.डी होईल एवढे लिखान आणि कविता आजवर त्यांनी लिहिल्या आहेत. कळंब परिसरात कुठेही माझे व्याख्यान असले की ते आवर्जुन हजेरी लावत असतात. बप्पांचा थोडासा सहवासही खुप काही नव्या संकल्पना आणि विचारांना जन्म घालत असतो.

आज जेव्हा ते काॅलेजवर त्यांच्या मुलीला भेटायला आले तेव्हा निवांत गप्पा गोष्टी झाल्या. सकाळीच सईला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण आज सायंकाळी व्हाट्स अॅपवर स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सतिश बप्पांनी राबवलेल्या उपक्रम पाहुण त्यांचे कौतुक करण्यासाठी माझ्या हातांची बोटे आपसुकच किपॅडवर नृत्य करू लागली. कळंब तालुका पत्रकार संघाने “आपली सई” या नावाने मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप उपक्रम हाती घेतला असुन याचाच एक भाग म्हणून आज कु.सई सतीश टोणगे हिच्या वाढदिवसानिमित्त येथील ‘संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थीनींना’ नगराध्यक्षा सौ.सुवर्णा मुंडे यांच्या हस्ते वर्षभरासाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

बुरसटलेल्या जुनाट विचारांना आणि रूढी परंपरांना छेद देऊन सतिश बप्पांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गोर गरिब अनाथ आणि मुकबधीर मुलींना वर्षभर पुरतील एवढे पॅड देऊन सामाजिक जाणिवेचा नवा पायंडा पाडला आहे. जीथं गरज आहे तिथं गरज पुरवली की ती सेवा जास्त प्रभावी ठरते. कळंब पत्रकार संघाने देखील हि भावना जोपासुन समाजाला नवा विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात अशा उपक्रमाचे आपणही अनुकरन करणे हिच खरी त्यांना शाब्बासकी ठरेल. कळंब व उस्मानाबाद परिसरात शहाजी चव्हाण हे वंचितांचे आणि अनाथांचे आधारवड म्हणून काम करतात. आपल्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातुन त्यांनी अनेक लेकरांची आणि पालकांची दुःख पुसण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याला सतिश बप्पा आणि मित्रांनी दिलेली साथ कौतुकास्पद आहे. आपणा सर्वांच्या कार्यास माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा. सामाजिक भान ठेऊन काम करणाऱ्या अशा पालकांचा मला सदैव अभिमान.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ एप्रिल २०१८