रविवारची ती एक सुंदर वेळ होती. पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असावे याचा विचार करत सोफ्यावर बसलेलो. व्याख्यान असो किंवा भाषण या दोन्हीत बोलतानाचा आत्मविश्वास हा शब्दांचा आत्मा असतो. पुस्तकाच्या मुखपृष्ठातुनही तो आत्मविश्वास दिसावा म्हणूनच मुखपृष्ठासाठी माझ्या अशा एखाद्या फोटोची शोधाशोध सुरू झाली. सरतेशेवटी शेकडो फोटो चाळल्यानंतर बेंबळी येथील व्याख्यानातला माईकसमोर आत्मविश्वासाने बोलतानाचा एक फोटो सापडला मग त्याला वेगवेगळ्या अॅप्समधून धुवून काढून सरतेशेवटी अनेक प्रयत्नांतुन हे मुखपृष्ठ जन्माला आलं.

मुखपृष्ठ साधे पण तितकेच प्रभावी असावे अशी संकल्पना डोक्यात फिट्ट बसली होती. कॅलिग्राफी ज्या ताकदीची झाली तेवढीच मृखपृष्ठाची डिझाइनही असावी असे ठरवले होते. शेवटी माझ्या संकल्पना घेऊन अमोल लोहार सोबत त्याच्या स्टूडिओत बसुन त्याचे सिनेमॅटोग्राफिक स्ट्रोक वापरून हे मुखपृष्ठ तयार झालंय. या पुस्तकाचे मलपृष्ठही तितकेच तोडीस तोड झालंय परंतु ते; तुम्ही पुस्तक घेतल्यावरच पाहता येईल. तेवढी उत्सुकता तर शिल्लक ठेवावीच लागेल. इथून पुढे हेच मुखपृष्ठ ‘मुलुखगिरीचा’ चेहरा म्हणून काम करेल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ मार्च २०१९