खरं म्हणजे प्रस्तावना ही कुण्या बड्या साहित्यिकाची वगैरे असली की पुस्तक गाजते असा पायंडा आहे किंवा चौकट आहे असे म्हणा. परंतु आजवर मला ज्यांनी गाजवत ठेवलं त्या टाळ्यांनाच जर पुस्तकाची प्रस्तावना करायला लावली तर कसे राहील ? हा प्रश्न मनात आला आणि तथाकथित चौकटी मोडून मुलुखगिरीला टाळ्यांची प्रस्तावना घेण्याचा मी निर्णय घेतला.

व्याख्यानानंतर पडलेल्या टाळ्या, फुंकलेल्या शिट्ट्या, दिलेली अलिंगणे, केलेली हस्तांदोलने, पेरलेले शब्द आणि उगवलेले विचार हीच या पुस्तकाची प्रस्तावना आहे. खरंच टाळ्या शिट्ट्या एक माणुस म्हणून जिवंत झाल्या तर त्यांना काय वाटेल. त्या काय लिहतील ही कल्पना करून त्याच टाळ्या शिट्ट्यांना या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा मान दिला आहे.

कल्पनाशक्ती हा लेखकाचा तिसरा डोळा असतो या पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी मी तो थोडासा उघडला आहे. बाकी संपुर्ण पुस्तक दोन डोळ्यांना दिसलेल्या गोष्टींचे जस्संतस्स वर्णन आहे. आजवर श्रोत्यांच्या टाळ्यांनी मला जो आत्मविश्वास दिला त्याची कुठंतरी उतराई म्हणुन माझ्या या नाविण्यपुर्ण पुस्तकास त्यांची प्रस्तावना घेतली आहे. श्रोत्यांच्या प्रतिसादाची प्रस्तावना असणारं ‘मुलुखगिरी’ एकमेव पुस्तक असेल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २६ मे २०१९