मुलुखगिरीचा पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक १४ जून २०१९ रोजी शब्दांनी भरलेल्या आल्हाददायी वातावरणात समस्त पांगरीकरांच्या साक्षीने आमच्या पांगरी ग्रामपंचायतीसमोर पार पडला. पांगरीचे जेष्ठ पत्रकार तात्या बोधे यांच्या अध्यक्षतेखाली व कासारवाडीचे मा.सरपंच आणि माझ्या पहिल्या व्याख्यानाचे आयोजक राकेश मंडलिक यांच्या शुभहस्ते मुलखगिरीचे प्रकाशन झाले.

हा पुस्तक प्रकाशन सोहळा माझ्या गावातच आयोजित करण्याचा उद्देश सफल झाला. मित्रांच्या मनोगतांनी पांगरी दुमदुमली. शब्दांचा आणि पुस्तकांच्या संस्काराचा धागा पकडून प्रमुख मान्यवरांनीही सुंदर भाषणे केली. तात्यांचे अध्यक्षीय भाषण ऐकताना डोळ्यात पाणी तरळले. अतिशय पोटतिडकिने त्यानी आजवर केलेली साहित्य सेवा मला नेहमीच प्रेरणादाई राहिली आहे. तात्यांना अध्यक्षपदाचा मान दिल्याबद्दल त्यांनी भाषणात कृतज्ञता व्यक्त केली. तात्यांची कौतुकाची थाप म्हणजे कार्यक्रम सार्थकी लागल्याची पावती होती.

झाडाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली, प्रमुख मान्यवरांचा सत्कार वृक्षभेट देऊन करण्यात आला. उपस्थितांचा गौरव शब्दसुमनांनी केला. पांढरी गावच्या भाग्यश्री शिंदे या एक सामान्य गृहिणी परंतु वाचणाचा छंद असल्याने त्यांनी आजवर तिनशेहून अधिक पुस्तके वाटली आहेत त्याबद्दल एक आदर्श वाचक म्हणून त्यांचा विशेष सन्मान केला तसेच माझ्या डोक्यातली प्रत्येक संकल्पना रूपेरी पडद्यावर साकारणारा सिनेमॅटोग्राफर अमोल लोहार याचाही विशेष सन्मान याप्रसंगी केला. असा छोटेखानीच परंतु देखणा आणि नाविण्यपुर्ण कार्यक्रम पांगरीच्या ईतिहासात पहिल्यांदाच पार पडला.

याप्रसंगी व्याख्याते खंडू डोईफोडे, व्याख्याते प्रमोद भोंग, पत्रकार विश्व लिमये, धनंजयराव जाधव, ऋषिकेश जाधव, शुभम मिसाळ, ऋषिकेश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून मला शुभेच्छा दिल्या. प्रमुख मान्यवर म्हणून स.पो.नि सचिन हुंदळेकर, सरपंच इन्नूसभाई बागवान, अॅड.अनिल पाटील, नवनाथ कसपटे, प्रा.विलास जगदाळे, मा.उपसभापती विजय गरड, मोहनबापू घावटे यांसह आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गोडसे यांनी केले तर सुत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या माझ्या भाषणातून चौफेर विचारमंथन केले. निमित्त जरी पुस्तक प्रकाशनाचे असले तरी गावाच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक महत्वपुर्ण विचार मांडले. विरासह माझ्या सर्व कुटुबीयांनी हा सोहळा डोळ्यात कैद केला. मुलुखगिरीच्या निमित्ताने चार अभिमानाचे क्षण त्यांच्या वाट्याला देऊ शकल्याचे समाधान लाभले. कार्यक्रमानंतर गावातील अनेक लोकांनी माझा सत्कार केला. पुस्तके खरेदी करून विचारांशी नाळ जोडली.

पुस्तकावर ऑटोग्राफ देण्यात आणि मैत्रजणांना सेल्फी देण्यात अभिमान वाटला. गावातील आणि गावाबाहेरील, तालुक्यातील व तालुक्याबाहेरील एवढंच नाही तर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक युवा मित्रांनी मुलुखगिरीच्या प्रकाशनास हजेरी लावली. यामध्ये मुंबईहून आलेले ABP माझाचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये, सोलापूरहून आलेले राहूल बिराजदार, अहमदनगरहून आलेले रमेश पाटील आणि काजळ्याहून आलेला रितेश सुरवसे यांचे विशेष आभार. माझ्या विचारांवर असलेल्या प्रेमापोटी या पोरांनी एवढं अंतर कापलं हे प्रेम खुप दुर्मिळ आहे.

पांगरीसारख्या खेडेगावात असा देखना आणि वैचारिक कार्यक्रम उभा करण्यात जेवढा माझा वाटा आहे तेवढाच माझ्या तमाम मैत्रजणांचाही आहे. फ्रेमला डिजिटल चिटकवण्यापासुन ते कार्यक्रम संपल्यानंतर खुर्च्या आणि चटया उचलेपर्यंत झटलेल्या श्रीराम तरूण मित्र मंडळाच्या प्रत्येक सदस्याचा या सोहळ्यात वाटा आहे. या सर्वांच्या मदतीमुळेच गावाच्या ईतिहासातला पहिला पुस्तक प्रकाशन सोहळा यशस्वी करू शकलो.

मुलुखगिरी सत्यात उतरवण्यासाठी सहकार्य केलेल्या प्रकाशक रोहित शिंदे, अक्षरजुळवणी केलेले राहुल भालके, सहकारी हनुमंत हिप्परकर, सिनेमॅटोग्राफर अमोल लोहार यांचे आभार तसेच प्रकाशन सोहळा सत्यात उतरण्यासाठी सहकार्य केलेले पांगरी ग्रामपंचायतीचे सरपंच इन्नूस बागवान श्रीराम पेठेतले माझे सर्व लहाणपणीचे मित्र, नातेवाईक, जेष्ठ मंडळी यांचे आभार.

सत्कारासाठीचे वृक्ष उपलब्ध करून दिलेले सामाजिक वनिकरणचे अधिकारी मुलाणी साहेब, मुस्कान साऊंड सिस्टीमचे असिम शेख यांचे देखिल आभार अणि सरतेशेवटी या कार्यक्रमात प्राण ओतलेल्या प्रत्येक पांगरीकरांचे आभार. कृतार्थ जाहलो धन्यवाद !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ जून २०१९