विचार पेरणीसाठी शब्दांचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन आजवर लय मुलुख फिरलोय, प्रबोधनाच्या या मुलुखगिरीत मला आलेले अनुभव प्रवासातच शब्दबद्ध करत आलोय. या समद्यांचा संग्रह नवोदित युवकांना प्रबोधनासाठी आणि वक्तृत्वासाठी प्रोत्साहित करेल याची खात्री आहे. शालेय विद्यार्थ्यापासुन ते वृद्धांपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या आवाजात अजुन शब्द उच्चारण्याची ताकद आहे. त्या सर्वांच्या व्यक्तिमत्वांना चिथावणी देणारे हे पुस्तक असेल. मुलुखगिरीतले अनुभव जरी माझे असले तरी हेच अनुभव तुम्ही देखील तुमच्या पाठीशी ठेवू शकता फक्त अखंड वाचन आणि निरंतर चिंतन चालू ठेवा बाकी माईकसमोर घेऊन जायची जबाबदारी ‘मुलुखगिरी’ पार पाडेल.

महाराष्ट्रात रायगड ते गडचिरोली, कोल्हापूर ते नंदुरबार आणि कर्नाटक ते आंध्रप्रदेशच्या सिमेपर्यंत माझा आवाज घुमलाय. हवेत पेरलेले विचार लोकांच्या डोक्यात मुरवण्याचा न थांबता, न थकता यशस्वी प्रयत्न करत आलोय. व्याख्यानांची पाच शतके पुर्ण केल्यानंतर मागे वळून पाहताना स्वतःचाच अभिमान वाटतोय. मुलुखगिरी या पुस्तकात माझ्या निवडक शंभर व्याख्यानांचे अनुभव आणि माझ्या लिखानातून व व्याख्यानातून प्रेरणा घेऊन स्वतःला लेखक आणि वक्ता म्हणून सिद्ध करू पाहणाऱ्या भविष्यातील सृजनशिल लेखकांची मनोगते वाचायला मिळणार आहेत. तेव्हा असे हे नाविण्यपुर्ण पुस्तक तुमच्या पुस्तकांच्या संग्रहात असायलाच हवे.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २७ मे २०१९