१९ फेब्रुवारीच्या निमित्ताने नियोजित वेळापत्रकात असलेली १९ व्याख्याने यशस्वीपणे आणि प्रभावीपणे पार पडल्याचे समाधान लाभले. १० तारखेपासुन सुरू झालेल्या माझ्या विचारांच्या शिवजयंतीला आज स्वल्पविराम मिळाला. मोरवंची येथील प्रार्थना बालग्रामचे भुमिपूजन करून चेतवलेला विचारांचा अग्निकुंड आंध्रप्रदेशच्या सिमेजवळ असलेल्या हुस्सा या गावापर्यंत पोहचवला. हजारो श्रोत्यांच्या साक्षीने अनुभवाची शिदोरी आणखीन मजबूत केली.

लांब पल्ल्याचा प्रवास त्यात रस्ते अतिशय खराब असल्याने कधी कधी कार्यक्रमस्थळी पोहचेपर्यंत अवसान गळून जायचं पण माईकसमोर उभा राहून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” म्हणलं की शरिरातली प्रत्येक पेशी शक्तिमान व्हायची. आवाजाचा डेसिबल कैकपटीनं वाढायचा. सगळा थकवा विसरून मेंदुच्या पाठबळावर माझं शरिर विचारांचं युद्ध खेळायचं याचे सर्व श्रेय शिवछत्रपतींबद्दलच्या अस्मितेला जाते. शिवरायांना खुपदा वाचल्याने आता ते आपल्यात नाहीत यावर अजिबात विश्वास बसत नाही कारण विचारांची शिवजयंती साजरी करताना मला ते अदृश्य अवस्थेत जाणवले. जो डोक्यात शिवचरित्र भरतो त्या प्रत्येकालाही ते जाणवल्याशिवाय राहत नाहीत हे खात्रीने सांगतो.

प्रवासासाठी शरिर साथ देत होतं, बोलण्यासाठी नरडं साथ देत होतं, येड्यावाकड्या रस्त्यावर फोर्ड साथ देत होती आणि गाडी चालवायला हनुमंत साथ देत होता म्हणुन ही उड्डाणे शक्य झाली. खरं म्हणजे ड्रायव्हिंग मलाही फार आवडते परंतु डोक्यात विचारचक्र सुरू असताना ड्रायव्हिंग करणं धोक्याचं ठरतं त्यामुळे सारथ्याची बाजू हनुमंत हिप्परकरांनी यशस्वी सांभाळली त्याबद्दल त्याचे पहिल्यांदा आभार. फेब्रुवारी महिण्यातच बारावी बोर्डाची परिक्षा असल्याने व्याख्यानांसोबतच काॅलेजमधील प्रात्यक्षिक परिक्षा, बाह्यपरिक्षक म्हणून झालेली नेमणूक तसेच बोर्ड पेपरचे पर्यवेक्षण हे सगळं समांतर चालूच होते. शिवचरित्र वाचले की बहुआघाड्यांवर काम करण्याची वृत्ती रक्तात आपोआपच भिनते त्याला मी तरी कसा अपवाद ठरेल.

मोहीमेवर असताना मला पाठबळ दिलेल्या संस्थाध्यक्ष सोनवणे सर आणि डाॅ. चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाच्या माझ्या सर्व सहकारी प्राध्यापकांचे आभार. तसेच या काळात अनेक पुस्तके चाळावी लागली, अनेक ईतिहासकारांचे संदर्भ पडताळावे लागले त्या सर्व पुस्तकांचे आणि लेखकांचे आभार. लग्नानंतरची पहिलीच शिवजयंती त्यामुळे घरी यायला रात्रीच्या १ – २ तर कधी कधी पहाट उजडायची हे सगळं समजून घेणारी माझी बायको विराचे देखील आभार. माझ्या विचारांवर विश्वास ठेवून व्याख्यानासाठी निमंत्रित केलेल्या त्या तमाम आयोजकांचे आभार आणि सरतेशेवटी दिड-दोन तास मांडी घालून माझ्या समोर बसुन मला बोलण्याची प्रेरणा दिलेल्या हरएक श्रोत्याचे देखील मी मनापासुन आभार मानतो. आता थोडीशी विश्रांती घेतो. लवकरच विचारांची तिफन घेऊन पुन्हा सज्ज होईल.

टिप : शिवजयंती निमित्त पार पडलेल्या माझ्या १९ व्याख्यानांचे माहितीसह फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी ‘विशाल विजय गरड’ या अधिकृत फेसबुक अकाऊंटला एकदा अवश्य भेट द्या.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २८ फेब्रुवारी २०१९