बार्शीच्या मल्हार सचिन वायकुळे या बालकवीने माझ्या ह्रदयांकित या काव्यसंग्रहातली ‘मराठी’ ही कविता येथील स्मार्ट अकॅडमिने आयोजित केलेल्या एका शिबीरात सादर केली आहे. नुसती कविता सादर करून तो थांबला नाही तर ती कुणी लिहिली व कुठुन वाचली हे देखील मल्हारने सांगीतले. त्याच्या वडीलांनी कौतुकाने पाठवलेला व्हिडीओ मी पाहत होतो. आजच्या काॅपी पेस्टच्या जमान्यात लेखकाचे किंवा कवीचे नांव खोडून साहित्य शेअर करणाऱ्यांना ईवल्याशा मल्हारकडून धडे घ्यायला हवेत. एखादे साहित्य हे त्या लेखकाचे अपत्यच असते त्याच्याविणा ते ईतरत्र पाठवणे किंवा शेअर करणे म्हणजे शब्दांना अनाथ केल्यासारखेच असते. हल्ली माझेच काही लेख मला ईतर ग्रुपवरून नांगरे पाटील आणि नाना पाटेकरांच्या नावाने येतात. व्हाॅट्स अॅप किंवा फेसबुकवर एखादी सुंदर कविता आपल्याला फार आवडते परंतु त्याच्या खाली कवीचे नांव माहित नाही असे लिहिलेले असते. लेखकाची किंवा कवीची ओळख पुसण्याची आॅनलाईन संस्कृती फोफावत आहे. काही लोकांना लेखकांचा कंन्टेन्ट आवडतो पण जाणिवपुर्वक त्याचे नाव काढून ते शेअर किंवा सादर केले जाते. लेकराला पालकापासुन तोडुन यांना कसला आनंद मिळतो कुणास ठाव.

मल्हार सध्या प्राथमिक शिक्षण घेतोय परंतु एवढ्यातच त्याला पुस्तक वाचन, लेखन आणि वक्तृत्वाचे याडं लागलंय. घरात शिवबा घडवायचा असेल तर त्या घरात जिजाऊ आणि शहाजीराजे असावे लागतात. हा बालशिवबा सुद्धा वडील सचिनराव आणि आई माधवी वहिणींच्या मार्गदर्शनाखाली घडत आहे. भविष्यात बार्शीच्या साहित्य परंपरेत मल्हारचे देखील योगदान असेल हे त्याच्या ईवल्याशाच परंतु प्रभावी वाटचालीवरून ठळक होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण मल्हारकडे बघून खरी वाटू लागली आहे. त्याचा एकपाठीपणामुळे माझ्या कविता त्याला तोंडपाठ आहेत. घरातल्या सर्वांना तो या कविता ऐकून दाखवत असतो. ईवल्याशा लेकरांनीही त्या कविता लक्षात ठेवाव्या याच हेतुन ह्रदयांकित मध्ये अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत मी लिखान केले आहे. आज मल्हारने स्मार्ट अकॅडमित सादर केलेली माझी कविता हेकुन ह्रदयांकित लिहिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

विशाल म्हणजे खुप विशाल, विजय म्हणजे नेहमी विजय मिळवणारा आणि गरड म्हणजे गरूडा सारखी उंच झेप घेणारा. माझ्या नावाचा हा सुरेख अर्थ ज्याने रचला तो मल्हार सचिन वायकुळे नक्कीच साहित्याचे बिऱ्हाड खांद्यावर पेलणारा भासतोय. अभ्यासू पत्रकार, लेखक आणि वक्त्यांचे स्फुर्तीस्थान असलेल्या सचिनरावांच्या तालमित तयार झालेला हा शब्दांचा मल्ल नक्कीच आई वडीलांचे नांव काढीन यात शंका नाही. वक्ता होण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यासंदर्भात सचिन सरांनी बार्शीत सुरू केलेला स्मार्ट अकॅडमीचा हा नाविण्यपुर्ण उपक्रम बार्शीची वक्तृत्व संपदा वाढवणारा ठरला आहे. मल्हारला आणि स्मार्ट अॅकॅडमीला पुढील वाटचालीस माझ्या शब्दरूपी शभेच्छा, धन्यवाद मल्हार !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ एप्रिल २०१८