शाळेचे दिवस होते मी इयत्ता पाचवीत शिकत होतो. दोन बंधाचे दफ्तर पाठीवर अडकवून शाळेला जायचो, घरातुन निघताना खोलीतल्या आरशाजवळच्या दिवळीत टाचा उंच करून हात फिरवायचो, आईने ठेवलेल्या सुट्ट्या पैशांपैकी चार आणे, आठ आणे हाती लागायचे. चार आणे सापडले की बाॅबॅ खायच्या, आठ आणे सापडले की लिंबाखाली बसलेल्या नांदेडकर मामाची भेळ खायची आणि नशीबाने जर कधी रूपयाचा डाॅलर सापडला तर दिलखुश आईस्क्रीम खायचं हे फिक्स ठरलेलं असायचं.

ज्या दिवशी खिशात रूपया असायचा तेव्हा कधी एकदा दुपारची सुट्टी होते असे व्हायचे. बरोबर चार तासानंतर तसलिम मामा बेल वाजवायला ऑफीसकडून बेलकडे निघालेले दिसायचे. तेव्हा हात खिशात घालायचा तो एकचा डाॅलर घट्ट मुठीत पकडायचा आणि घंटा वाजली रे वाजली म्हणलं की लिंबा जवळ उभा असलेल्या दिलखुश आईस्क्रीमच्या गाड्याकडे धुमाट पळायचो. गेल्या-गेल्या आईस्क्रिमवाल्याच्या हातात रूपया टेकवून ‘ओऽऽ एक आईस्क्रीम द्या’ असं मोठ्ठ्याने म्हणायचो. लागलीच तो आईस्क्रीमवाला गाड्यावर अडकवलेला कोन पिशवीतुन काढायचा मग ते दोन तीनदा त्या बर्फात ठेवलेल्या डब्यातले आईस्क्रीम त्याच डब्याला खरडुन शेवटी एका फिरत्या चमच्याने आईस्क्रीमच्या कोनावर ठेवायचा आन् वर चेरी पण लावायचा. हे सगळं बघतानाच तोंडाला पाणी सुटायचे.

हातात आईस्क्रीम घेतल्या घेतल्या पाणीदार जीभेने त्याचा पहिला चाट अनुभवायचा. मग ते आईस्क्रीम जिभेने आत कोनात ढकलायचे. नंतर त्या कोनाच्या कडा खायच्या मग कोनाचा शेंडा हळुच दाताने खाऊन टाकायचा. त्या टोकातुन वितळलेले आईस्क्रीम गळायला लागायचं पण त्यातला एकही थेंब खाली न पडु देता सगळं आईस्क्रीम संपवायचो आणि शेवटी तो भिजलेला कोन खाऊन टाकायचो. खरंच फक्त एका रूपयात आत्मा तृप्त झाल्याचा फिल यायचा.

काल एका लग्न समारंभानंतर आमच्या पांगरीच्या वेशीत मला आईस्क्रीमचा गाडा दिसला. खुप दिवसानंतर ते कोनातलं आईस्क्रीम खायचा मोह झाला. त्या वेळेसचे एक रूपयाचे आईस्क्रीम आता पाच रूपयाला झाले आहे. परंतु आत्ताच्या लहाणग्यांसाठी त्याची टेस्ट व्हॅल्यू अजूनही तेवढीच आहे हे त्या गाड्याच्या सभोवताली जमलेल्या बच्चे कंपनीच्या चेहऱ्याकडे पाहून अनुभवलं. आईस्क्रीम घेतल्यानंतर त्याला पैसे देण्यासाठी जेव्हा खिशात हात घातला तेव्हा क्षणात त्या रूपयाची आठवण झाली पण पाच रूपयासाठी पाचशेची नोट द्यावी लागल्याने उगाच मोठे झाल्याची खंत वाटली. तो कोन हातात घेताच अगदी लहानपणीसारखाच खायला सुरूवात केली. मी पुन्हा पाचवीत जाऊन रूपायावालं आईस्क्रीम खात होतो आणि माझ्याकडे बघुन रवीदादा आणि राहूल हसत होते. मोठी माणसे लहाणांसारखी वागायली की लोक हसणारंच परंतु तरीबी असा अनुभव घ्यायलाच हवा कारण मोठेपणी लहान होण्यात जी मजा आहे ती लहानपणीच मोठे होण्यात नाही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक: ०९ मे २०१८