आमची लेक कादंबरी (साऊ) या जगातले सर्वात शक्तिशाली शस्त्र चालवायला शिकल्याचा आनंदोत्सव साजरा करतोय. वर वर साधी वाटणारी ही गोष्ट वाटते तेवढी साधी मुळीच नाही. हाताचा पंजा ते वहीचे पान व्हाया घराच्या भिंती आणि गादीचे बेडशीट असा तिचा लिहिण्याचा प्रवास झालाय. जेवणाची नाटकं, मोबाईलचे फॅड, खेळण्याचे वेड यातून ही दोन वर्षाचं लेकरू असं रोज अर्धा तास वहिवर उभ्या आडव्या रेषा मारत बसवणं म्हणजे मोठं दिव्यच पण रोज सराव असावा म्हणून आम्हीही तिचा कधी पिच्छा सोडला नाही. आज जेव्हा ती अशी हातात पेन धरते तेव्हा तिच्याकडं कौतुकानं नुसतं एकटक पाहत बसावसं वाटतं. कायबी म्हणा बरं का ! पोरगी सध्या वाहिवर फक्त ‘एक’ अंक काढायला शिकलीये; पण तिचा तो कागदावर पेनने गिरवलेला ‘एक’ मला जणू पृथ्वीला लटकलेल्या काठी एवढा मोठा वाटायलाय.

महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात ज्यावेळी पहिली मुलींची शाळा काढली तेव्हा त्या शाळेत आलेली पहिली मुलगी मुक्ताने जेव्हा वहिवर ‘एक’ लिहिले असावे तेव्हा त्यांनाही केवढा आनंद झाला असेल ना. आज माझ्या साऊने काढलेल्या एकच्या मुळाशी त्या एका स्त्रीचे आभाळाएवढे योगदान आहे म्हणूनच मला हा लेकीच्या कौतुकाचा आनंद उपभोगत असताना सावित्रीबाईंचे स्मरण करणे क्रमप्राप्त वाटलं. बाकी जगावर प्रभाव पाडायचा असेल तर या लेखणीच्या शस्त्र सरावात आपली लेकरं पारंगत व्हायलाच हवी. पुढे त्यांची समज जस जशी वाढेल तस तसा त्यांना पुस्तकाचा रतीब चालू करावा. एकदा का लेखणीचं आणि मेंदूचं नातं जुळलं की जगण्याच्या स्पर्धेत आपली लेकरं कधीच गाभूळी राहत नाहीत.

विशाल गरड
८ जुलै २०२२, पांगरी