माझ्या घराम्होरं एक मोठ्ठ वडाचं झाड हाय, तवा डोस्क्यात ईच्चार आला की आपुण तर आपलं वंश तयार करतुय पण ईतकी वरीस झालं आजुन ह्यजा वंश तयार नाय म्हणूनच मग या झाडाचं पिल्लू रानात न्हिऊन लावायसाठी त्या मोठ्ठ्या झाडाची ही फांदी तुडुन आणलीया. माझा धाकला भाऊ युवराज आन् म्या सकाळच्यापारीच ह्यो खेळ मांडलाय. चांगला दोनफुट खोल खड्डा खांदुन त्यात शेण आणि पालापाचोळा टाकुन ही फांदी लावून टाकली. आळं करून त्यात पाणी वत्ताना जणू रडणारं लिकरू आईचं दुध तोंडाला लागलं की जसं गप पडतंय तसंच आमच्या वडाचं ही पिल्लूबी खड्ड्यात गेलं की गप झालं. बाळाला जसं टकुचं आस्तय नव तसंच ह्या फांदीच्या डोक्यावर शेणाचं टकुचं बशिवलंय. लय आनंद झालाय आज आमचं झाड डिलीवरी झालंय.

आमच्या घरासमोरील झाड

आईबरूबर लेकराचं रक्ताचं नातं आस्तंय जणू, या लेकराला त्येज्या आईच्या पोटातुन बाहीर काढताना म्या पाहिलंय ते रगात. आरं कोण म्हणतंय झाडांला रगात नसतंय आवं अस्तंय की, वडाच्या झाडातुन निघणारं पांढरं चिकाट रगात हाताला लागल्यावर निघता निघत नाय. हेच रगात या फांदीला मातीसंग लवकर चिटकीवतंय. लका आपला वंश वाढावा, नांव चालावं, खांदान टिकावं म्हणुन किती जिवाचं रान करताव आपुण मंग या झाडांलाबी त्यो आधिकार हायच की, नुसतं फांद्या लावून येणारी झाडं आशी वांझ ठिऊ नगासा. तुमच्याबी घराजवळ, पटांगणात न्हायतर रानात जर आसंल एकांदं वडाचं न्हायतर पिपळाचं झाड तर त्या झाडाचा वंश नक्की वाढवा.

धाकटा भाऊ युवराज मदत करताना

जगात ह्येज्यापेक्षा भारी ईकान कोण्चंच नाय, आवं कुठल्या आणल्यात्या बंदुकी आन बाॅम्ब. ही एक वडाची फांदी हजारो वरीस जगण्याचं सामर्थ्य ठिवती फकस्त तीला चिटाकणं गरजेचं हाय. जगातली समदी क्षेपणास्र माणसं मारायसाठी बनिवल्याती पण हे माझ्या हातातलं ईकान मातुर माणसं जगिवण्यासाठी तयार केलंय निसर्गानं. लहानपणी खोट्या बंदुकी हातात घिऊन लयंदा ढिश्क्यांव – ढिश्क्यांव खेळलोय पर आता समजतंय त्येज्यापरिस ह्ये अशा फांद्या तुडुन जर मातीत लावायचा खेळ खेळला आस्ता तर आतापतुर एक बारंकं जंगल तयार झालं आस्तं. जाऊंद्या आता माझ्या पुरीला म्या झाडं लावायचा खेळ शिकवीन. जे आपल्याला नाय जमलं ते आपल्या लेकरांकडून जमवून घ्येयचं ह्यालाच तर संस्कार म्हणत्यात ना.

शेंड्याला शेणाचे टकुचे

बरं ह्यो फुटू काय मज्जा म्हणुन नाय काढला ह्ये वरी ल्हिवल्यालं समदं सांगायचं व्हतं तुम्हास्नी म्हणुन केला हा अट्टाहास. वडाच्या पिल्ल्यासोबतचा ह्यो फुटू आन् त्या फुटू मागचा ईच्चार जर तुम्हास्नीबी आवडला तर जाऊंद्याकी ही पोस्ट लांबपतूर. होऊंद्या एक शेअर पिल्लू के नाम.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ जुलै २०२०