४०० वर्ष जुने झाड जर रस्ता करण्यासाठी आडवे येत असेल तर आपली झक दुसरीकडून मारावी ना. झाड तोडणे हाच एक पर्याय असतो का ? नका राव एवढे निष्ठुर होऊ, लॉकडाऊनमुळे आम्हा पर्यावरण प्रेमींना आंदोलन उभा करता येणार नसल्याचा असा फायदा घेऊ नका. मला मिळालेल्या माहितीनुसार वन्य जीव कायद्याने सदर झाडाला राष्ट्रीय संपती जाहीर केली आहे तरीही एका महामार्गासाठी आता या झाडाचा खून होणार आहे किंवा केलाही असेल कदाचित.

प्रशासनाला त्यांची रस्ते बांधणी कला एवढीच दाखवायची असेल तर उड्डाणपूल बांधा त्या झाडावरून, जगात नाव होईल तुमचे. असेही सर्वसामान्य जनतेकडून कर स्वरूपात आलेल्या पैशातूनच होतात ही विकासकामे. मग टेंडर काढल्यापासून ते रोड होईपर्यंत कुणाला किती पैसे मिळतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. हे रस्ते बनवण्यात सर्व्हिस कमी अर्थकारणच जास्त असते. तेव्हा काय पोटभर खायचे ते खावा बाबांनो, पण त्या झाडाला तेवढं जीवदान द्या. काय आहे ना; त्याला बिचाऱ्याला ४०० वर्षापूर्वी माहीत नव्हते ओ की पुढे चालून आपण रस्ता करायला अडचण करणार म्हणून नाहीतर ते उगवलंच नसतं की.

आम्ही म्हणत नाहीत एकही झाड तोडू नका. शेवटी विकासकामे करताना ते शक्यही नाही पण निदान महाकाय वृक्ष तरी वाचवत चला. हल्ली रस्ते सुद्धा खरच लोकांच्या सोयीसाठी की नेते व अधिकाऱ्यांनी त्या रोडच्या कडेला घेतलेल्या जमिनीचे भाव वाढवण्यासाठी होतात ? याचीच शंका वाटते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या माननीय पर्यावरण मंत्र्यांनी ‘जनता गॅरेज’ चित्रपटातील तामिळ हिरो एन.टी.आर सारखी एन्ट्री मारून हे झाड वाचवायला हवे असे मला वाटते. खुर्ची चार दिवसाची पाहुनी असते पण जर तेवढ्यात सुद्धा अशी काही धाडसी कामे केली की लोक तुम्हाला खुर्ची गेल्यावरही लक्ष्यात ठेवतात.

गेल्या ४०० वर्षात त्या गावातल्या दहा बारा पिढ्या या झाडाखाली खेळल्या असतील. करोडो आठवणींचे हे जिवंत दैवत असेल. करोडो रुपयांचा ऑक्सिजन फुकटात दिला असेल तसेच करोडो पक्ष्यांनी जन्म घेतला असेल याचा फांद्यांवर पण अरे माणसा ! तुला तुझ्या गाड्या प्रदूषण करीत करीत न्यायच्यात ना मोठ्या रस्त्यावरून मग त्यापुढे हे झाड किस खेत की मुली. “हे वटवृक्षा आम्हाला माफ कर, सध्यातरी तुझ्यासाठी हे चार शब्द लिहिण्याशिवाय दुसरं काहीच काही करू शकत नाहीत आम्ही, पण या शब्दांना जर भाले फुटले तर मात्र तू नक्कीच वाचशील याची खात्री आहे. वाचलास तर एक दिवस नक्की येईल तुझ्या सावलीतला धन्यवाद स्विकारायला नाहीतर इथूनच जड अंत:करणाने तुला भावपुर्ण श्रद्धांजली.

झाडाचा पत्ता.
मु.पो.भोसे, ता. मिरज, जि.सांगली.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १५ जुलै २०२०