माझ्या मेंदुतील ८६ अब्ज मज्जातंतूंना विचारांचा खुराक वाचनातून मिळतो. उपाशी पोटी असताना जसं मेंदु काम करत नाही तसं वाचनाअभावी तो प्रभावी ठरत नाही. फक्त जेवन करून ईतिहास घडत नसतो पण वाचन करून मात्र नक्की घडतो. चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जगातली सर्वात मोठी राज्यघटना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली या तिन्ही ऐतिहासिक घटनांचा पाया ‘वाचन’ आहे.

मी असेल नसेल उद्याच्या जगात पण लोक माझे शरिर नाही तर मेंदु लक्षात ठेवतील; नव्हे तो त्यांना ठेवावाच लागेल एवढे सामर्थ्य त्यामध्ये मी निर्माण करीन. होय, हे सर्वांनाच शक्य आहे पण वाचनाचं व्यसन जडलं तर. एका पुस्तकाची नशा हजारो लिटर दारू पेक्षाही कैकपटीने जास्त असू शकते. मेंदुला झिंगवणाऱ्या नशेपेक्षा मेंदुला विचार करायला लावणारी वाचनाची नशा सर्वांनीच करायला हवी. माणसाने किती वाचायला हवे याचे विशिष्ठ असे काही मानक नाही परंतु मला मात्र निदान माझ्या मेंदुत असलेल्या न्युराॅन्स एवढे तरी शब्द वाचायचे आहेत. हे स्वप्न भयंकर मोठ्ठं आहे पण डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी सांगीतल्याप्रमाणे स्वप्न पाहणे गुन्हा नसतो पण लहान स्वप्न पाहणे गुन्हा आहे म्हणुन माझी प्रत्येक स्वप्न सुद्धा लार्जर दॅन लाइफ असतात.

साधारणतः अठरा मिनिटात एक पान हा माझा वाचनाचा वेग आहे. लेखणीच्या दर्जाप्रमाणे तो थोडासा कमीजास्त होत असतो. परंतु आपण जेवन जितक्या चवीने करतो तितकेच वाचनही करायला हवे. प्रत्येक शब्द मेंदुमध्ये फिक्स डिपाॅझीट करण्यासाठी फार मोठी प्रक्रिया नाही फक्त वाचताना नुसतं डोकं पुस्तकात घालण्यापेक्षा डोळे आणि मेंदुमधली झापड उघडी ठेवनं गरजेचे असते. पण ही झापड एकाग्रतेची असते तीच्या सहीशिवाय एकही शब्द मेंदुत रूतुन बसू शकत नाही. डोळे उघडल्यानंतर तर सर्वांनाच दिसत ओ पण त्या दिसण्यातली दृष्टी मात्र वाचनामुळेच बदलते तेव्हा उघडा डोळे आणि वाचा नीट.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : १५ ऑक्टोंबर २०१८ (वाचन प्रेरणा दिन)