शाळेत गणिताचा तास चालू होता. तेवढ्यात शिपाई मामा हातात सुचनेची वही घेऊन आले. सरांनी शिकवणे थांबवून विद्यार्थ्यांनो लक्ष द्या असे म्हणून ‘उद्या मकर संक्रांतीच्या सुट्टीमुळे शाळेचे कामकाज बंद राहील’ ही वहितली सूचना वाचून दाखवली. त्या क्षणापासून कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असे झालेले. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने शाळेतून घरी येताना चालण्यात वेगळाच उत्साह भरला होता. वाटेवर असणाऱ्या प्रत्येक दुकानातल्या भरण्यात ठेवलेले तिळगुळ पाहत पाहत घराचा उंबरा गाठला. दफ्तर ढाळजत टाकून बाहेर धूम ठोकणार तेवढ्यात आईने मोठा आवाज दिला “आरं हात पाय धुवून जा की” तसाच हातपाय तोंड धुवून टॉवेल घ्यायला आईच्या खोलीत गेलो तर आई तिच्या गोदरेजच्या कपाटात ठेवलेल्या साड्यांच्या घड्या घालत बसलेली. उद्या वावसायला जाताना कोणती साडी घालायची याचा धांडोळा घेत होती.

मी आईला सांगितले ” ए आयं मला परवादिशी शाळेत जाताना तिळगुळ न्यायच्यातं बघ, मला पाच रुपय दे मी दुकानातून आणतो” आई म्हणाली “आरं बापानं एवढं मोटं आणून ठिवल्यातं, त्योक देवघरात दरवाज्या मागच्या खुटीला टांगलेल्या पिशवीत हायतं जा काढून ठिव आत्ताच पुना बुम्बलू नकु माझ्याजवळ” आई हे सांगताना तिचे हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच मी देवघर गाठले. शेजारच्या कपाटातला एक डब्बा खाली ठेवून त्याच्यावर चढून ती वायरची पिशवी खाली घेऊन त्यातलं तिळगुळ एक बारक्या डब्यात घालून ठेवले.

देवघरासमोर ठेवलेल्या पोत्यावर कुंभाराकडुन आणलेले खण मांडले होते. त्यात गव्हाच्या ओंब्या, हरभरा, बोरं, ऊस, गाजर, ज्वारीचं कणीस, पेरू, तांदूळ आणि तिळगुळ या गोष्टी ठेवल्या होत्या. उद्या सकाळी हेच खण घेऊन आई नवी साडी घालून काकी, आंटी आणि शेजारच्या बायांसोबत विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात ववसायला जाणार होती. दुसऱ्यादिवशी लवकर उठून मी नवी कपडे घालून तयार झालो. आईसोबत जायला माझ्या बहिणीही नटून थटून तयार झाल्या तसा मी पण मागे लागलो तेव्हा आई बोलली “आरं पुरींचा सण हाय ही, तिथं पोरांचं काय काम हाय रं, बस्स गप्प घरी मी येताना रेवड्या आणते तुला”

संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या किंक्रांतीला शाळेत सगळ्यांना तिळगुळ वाटले. आई दिवसभर गावात हळदी कुंकाला जाऊन आली. मी शाळा सुटल्यावर घरी येऊन लुटून आलेल्या वस्तू पाहत बसलो; छोटा कंगवा, गोल आरसा, कुंकाच्या डब्या, वाट्या, तांबुले, तेलाच्या बाटल्या अश्या अनेक गोष्टी त्यात होत्या. आवडणाऱ्या सगळ्या वस्तू कापाटामागच्या दिवळीत लपवून ठेवून मी खेळायला बाहेर गेलो. माझी लहान बहीण गुडडीने निवडलेल्या वस्तू मी लपवून ठेवल्यामुळे तिने आईकडे रडत रडत तक्रार केली “आयं बग की भैड्यानं माझा कंगवा आन बारका आरसा लपवून ठिवलाय. त्याला द्यायला सांग न्हाईतर त्यजं दफ्तरच फडणाराय मी” गुडडीच्या या धमकीला घाबरून गुपचूप तिच्या वस्तू तिला देऊन टाकल्या. त्याबदल्यात आईने मला वाण म्हणून लुटून आलेला एक पेन देऊन नादी लावले.

लहानपणी पेनपेक्षा इतर गोष्टी भारी वाटायच्या पण आज तीन पुस्तकांचा लेखक झाल्यावर आणि फक्त पेन ने रेखाटलेल्या हजारो चित्रांचा उद्गाता अशी ओळख मिळवल्यावर संक्रांतीला आईने दिलेल्या त्या पेनची आठवण झाली म्हणून हा लेखप्रपंच. बाकी ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला हे अनुभव येतातच. “ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला” अशी जरी म्हण असली तरी मला मात्र आईने दिलेल्या वाणाचाच गुण लागला हे खरं.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १५ जानेवारी २०२०