आज जेष्ठ लेखक तथा प्रख्यात वक्ते उत्तम कांबळे यांची त्यांच्या नाशिक येथील ‘चार्वाकाशय’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. अतिशय व्यस्त वेळापत्रकातुन सकाळचे दोन तास कांबळे सरांनी मला दिले. विचारांच्या या समुद्रात दोन तास पोहताना अंग शब्दांनी भिजून गेलं. अक्षरशः विचार करण्याची प्रणाली बंद पडावी, डोकं अचानक हँग व्हावं असे जब्राट प्रश्न सरांच्या बोलण्यातुन उपस्थित होत होते. त्यांच्यासोबत नेहमीच गप्पा मारताना मेंदुची सर्वशक्ती पणाला लावली तरी अनुत्तरीतच राहावं लागतं. हे आभाळ इवल्याशा ढगाला आणि हा समुद्र ईवल्याशा थेंबाला स्वतःमध्ये सामावून घेतोय हेच त्याचं मोठेपण.

हजारो पुस्तकांचे चिंतन करून तयार झालेली त्यांच्या खास ठेवनीतली वाक्य काळजात रूतुन बसली. माझ्यासारख्या सामान्य लेखकाच्या साहित्यकृतीचे आणि कलाकृतीचे कांबळे सरांनी केलेले कौतुक आत्मविश्वास वाढवणारे आहे. सरांनी दिलेल्या सुचना जणू यशाच्या सर्वोच्च शिखरावर जायच्या पायऱ्याच असतात. ज्या ज्या वेळी मी नाशकात जातो तेव्हा सरांसोबत मस्त गप्पांची मैफील रंगवूनच परत फिरतो अर्थात सरही तेवढा वेळ देतात हा आपल्यासारख्यांसाठी सन्मानच म्हणावा लागेल. उद्या माझे नियोजित व्याख्यान चांदोरी येथे आहे पण आज कांबळे सरांनी मला त्यांच्या घरी दिलेले हे व्याख्यान मनाच्या पटलावर कायमचं छापलंय. याप्रसंगी माझ्यासमवेत अभिजित वनारसे आणि दिग्दर्शक गौरव दवांगे सोबतीला होते.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक :२१ सप्टेंबर २०१९