वीस वर्षापूर्वी शाळेत जर गुरुजींनी कधी विद्यार्थ्यांना आवडते खेळ विचारले तर सर्रास पोरं सुरपारंबा, लप्पा छप्पी, शिवना पाणी, लंगडी, लिंबू चमचा, गोट्या, कुया, लोमपात, चिर घोडी असे मैदानी खेळ सांगायचे, दहा बारा वर्षापूर्वी याच प्रश्नाचे उत्तर कॅरम, बुद्धिबळ, सबसिडी, पत्ते, कोडी असे बैठे खेळ असायचे आणि या दोन तीन वर्षात मात्र गुरुजींच्या प्रश्नांचे उत्तर हे पब-जी, लुडो, ब्लू व्हेल, रम्मी, वाय सिटी या मोबाईल गेम्स असतात. कालानुरूप खेळ बदलत गेले आणि विद्यार्थी देखिल ते आत्मसात करत गेले. विज्ञान शाप की वरदान हा  निबंध शालेय जीवनात खूप वेळा लिहिला त्यात वरदान म्हणून जे लिहिले त्यापेक्षा शाप म्हणून जे काही लिहिले होते ते साक्षात अनुभवण्याचा सध्याचा काळ आहे.

ज्या हातात विट्टी मारायला दांडा असायचा, ज्या हातात नेम धरून गोटी मारण्यासाठी आट्टू असायचा, जे हात झाडांच्या फांद्यांना धरून लोम्बकाळायचे तेच हात अहो हात कसले त्या हाताच्या फक्त दोन अंगठे आता मोबाईलवर ऑनलाइन खेळ खेळण्यात व्यस्त झालेत. आज जेव्हा आपली मुले मोबाईल हातात घेऊन तासंतास एकाच जागेवर बसून ऑनलाईन गेम्स खेळत असतात तेव्हा आपल्याला आपल्या लहानपणीच्या खेळांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या बालपणीची शारीरिक तंदुरुस्ती आणि आपल्या लेकरांची शारीरिक तंदुरुस्ती यातला फरक जर पाहिला तर याचे उत्तर ते त्या त्या कालखंडात जे खेळ खेळत होते त्यात सापडते.

शरीराचा व्यायाम घडवून आणणारे जुने खेळ आता कालबाह्य होत चालले आहेत, माणसाची बदलती लाईफ स्टाईल हे सगळं घडवत आहे. मुळात शहरात तर मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठीची मैदानेच शिल्लक राहिली नाहीत. जो तो फक्त ल्याविश घरे बांधण्यात गुंग आहे. खेडेगावात आजही पोरांना खेळायला बक्कळ जागा शिल्लक आहे पण बड्या शहरात राहणाऱ्या लेकरांना मैदानी खेळ खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे म्हणजे फार मोठे दिव्य आहे. आपले पारंपरिक खेळ का लोप पावत चालले याचे हे कारण आहे.

जो मुलगा किंवा मुलगी लहानपणी गावकुसात खेळले, लहानाचे मोठे झाले ते नोकरी नावाच्या पिंजऱ्यात अडकून शहरात राहायला गेले मग स्क्वेअर फुटात भाव असलेल्या काँक्रीटच्या जंगलात कुठले आलेत मैदाने आणि काय ? पालकांची इच्छा असतानाही ते त्यांच्या पाल्यांना बाहेर खेळायला पाठवू शकत नाहीत. शारीरिक तंदुरुस्ती मजबुत ठेवणारे आपले पारंपारिक खेळ तिथे खेळणे शक्य नाही. एक पिढी गावात राहते आणि दुसरी शहरात त्यामुळे त्यांच्यावर होणारे खेळांचे संस्कार सुद्धा त्यावरच अवलंबून असतात. गावातल्या पोरांना शहरात गावठी खेळ खेळणे कमीपपणा वाटतो पण तीच शहरातली पोरं गावाकडे येऊन जेव्हा मोबाईलवर हाय ग्राफिक्स गेम खेळतात तेव्हा ते खेळणे त्यांना हाय प्रोफाइल वाटतं. अपल्या पारंपरिक खेळांची विकेट नेमकी इथेच पडली.

सुरपारंबा या खेळात झाडावर चढणे उतरने हे सराईतपणे व्हायचे त्यामुळे झाडांसोबत मैत्री व्हायची, झाडांच्या सावलीत दिवस जायचे, दगडी गोट्या खेळताना जेव्हा पेलन लागायची तेव्हा गोटी पेलताना सगळे मित्र चिडवायचे त्यातून नैराश्य वगैरे नाही तर मनाची मजबुती व्हायची. लप्पा छप्पी, शिवणापाणी चोर पोलिस या खेळात बक्कळ पळणे व्हायचे त्यामुळे भूक जास्त लागायची, कुया, पाकिटे, टोपणे या वस्तू हुडकण्यासाठी गावभर उकिरड्यांची भटकंती व्हायची त्यामुळे गावातील गल्ली ना गल्ली आणि बोळ ना बोळ माहिती व्हायची. लोमपाट, कबड्डी, रस्सीखेच या खेळात सांघिक भावना वृद्धिंगत व्हायची, दिवाळीच्या काळात महानंदीच्या झाडापासून टिकल्या उडवायची बंदूक तयार करताना संशोधन वृत्ती जोपासली जायची, नदीवर मासे पकडून मग त्याची पार्टी करण्याच्या खेळातही कष्ट केल्यावर पोट भरते याची जाणीव जिवंत व्हायची.

आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिखरावर बसून आपले पारंपरिक आणि जुने खेळ लुप्त होत चालल्याचे दिसून येते, आपल्या पिढीनंतर आता ते पुन्हा कधी खेळले जातील याची शंका वाटते. अजूनही गावकुसातील काही लेकरांनी वरील खेळ औषधाला का होईना पण जिवंत ठेवले आहेत आता ते नामशेष होण्याआधी त्यांचे जतन व्हावे ते खेळले जावे यासाठी आपणच प्रयत्नशील राहायला हवे अन्यथा ग्रामिण भागातले हे अस्सल क्रिडा साहित्य काळाच्या मिठीत लुप्त होऊन जाईल.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ६ एप्रिल २०२१ (जागतिक क्रिडा दिन)