सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत कधी नाही तेवढी बिनविरोधची चर्चा होत आहे, गावोगावी मिटिंगा सुरू आहेत. गावपातळीवरच्या निवडणुका म्हणजे वैरत्व निर्माण होण्याच्या खानी असतात पण बिनविरोध निवडणुकीमुळे असे वैरत्व कमी होण्यास मदत होते. लहान गाव असेल तर दहा लाख, मोठे गाव असेल तर पंचवीस लाख असा एकंदरीत खर्च प्रत्येक पॅनलला करावा लागतो पण जर हाच पैसा निवडणुकांऐवजी गावातील विकास कामासाठी वापरला गेला तर नक्कीच गावचा विकास होण्यास मदत होईल यात दुमत नाही. पण,

ग्रामपंचायत अधिनियम माहित असलेला, सर्व योजनांची बऱ्यापैकी माहिती असलेला, गावासाठी वेळ देऊ शकणारा, उच्च शिक्षितच असावा असेही काही नाही पण किमान त्याला मराठी इंग्रजी वाचता व लिहिता यावे असा. धर्मनिरपेक्ष भावनेने काम करणारा, गावासाठी मुलभूत सुविधांसह शिक्षण आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देणारा. गावची पाणीपट्टी, घरपट्टी वसूल करू शकणारा, तेवढ्यापुरते राजकारण आणि दिर्घकाळ समाजकारण करणारा उमेदवार असेल तरच बिनविरोध करा

आणि जर बिनविरोधच्या नावाखाली गावकऱ्यांना वेगवेगळी आमिष दाखवून सिमेंट काँक्रीट रोडमध्ये कमी सिमेंट वापरणारे, पदाचा वापर फक्त स्टार्चची कपडे घालून रुबाब मारायला करणारे, गावठाण जमीन जमीनदारांना वाटणारे, घरकुल मंजूर करून बंगला बांधणारे, ग्रामसेवकाला हाताशी धरून घफळा करणारे, फक्त ग्रामसभेदीवशीच ग्रामपंचायतीचे तोंड पाहणारे, गावातल्या युवकांचा वापर त्यांना दारू पाजून, पार्ट्या देऊन, गुटखा मावा खाऊ घालून स्वतःचा उधोउधो करून घेणारे उमेदवार लादले जाणार असतील तर त्याचा विरोध करा.

बिनविरोध निवडणूक लोकशाहीला जेवढी पूरक तेवढीच ती मारकही असते. निवडणुकीची ताकद फार मोठी असते, ती लढून जिंकण्यातही तितकीच मजा असते. बिनविरोध निवडणुकीमुळे गावातील तंटे कमी होतील, प्रशासनाचा खर्च वाचेल, भाव भावकितली खुन्नस कमी होईल पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गावातील दोन मुख्य विरोधक एकत्र येऊन संघंमताने विकासकामातून स्वतःचा विकास साधण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सरकारने ग्रामपंचायतीत सुद्धा विरोधी पक्षनेता हे पद निर्माण करायला हवे. निवडणूक बिनविरोध झाली तरी वाईट गोष्टींचा आपण विरोध करायलाच हवा कारण विरोधक नसला की लोकशाही लंगडी होते.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ डिसेंबर २०२०