आज आमच्या हेमा आन्टी घरासमोरील झाडांना पाणी देत होत्या, साऊ जवळच वडाच्या झाडाखाली खेळत बसली होती. खेळता खेळता ती तिच्याकडे पाणी देताना पाहत होती, विरा घरात काहीतरी काम करत असल्याने तिने माझी ड्युटी साऊकडे लक्ष द्यायला लावली होती त्यामुळे मी झाडाखालील कट्ट्यावर बसून साऊचे दुडू दुडू चालणे न्याहाळत होतो, तेवढ्यात आन्टी पाईप खाली टाकून नळ बंद करण्यासाठी घरात गेल्याचे साऊने पाहिले आणि ती पळतच पाईपकडे गेली. तिने खाली पडलेला पाईप उचलून  झाडांच्या आळ्यात धरला आणि पाईपमधून झाडांच्या बुडाशी पडणारे पाणी कुतूहलाने पाहू लागली. साऊची ही कृती पाहून मी पळतच जाऊन हा क्षण मोबाईल मध्ये टिपला. शेवटी बापाचे काळीज ते, लेकीच्या एवढ्याशा गोष्टीचे सुध्दा कौतुक वाटणारंच की.

लहान लेकरांच्या मेंदूची ताजी ताजी निरीक्षण शक्ती आपल्यापेक्षा कैकपट जास्त असते. मोठ्यांच्या कितीतरी कृती, हावभाव, देहबोली आणि भाषा ती फक्त निरीक्षणातून शिकत असतात. पालकांनी लेकरांवर आवर्जून संस्कार करायची गरज नसते, आपण आपली कृती करत राहायची; लेकरं त्यांची ती शिकत राहतात. अर्थात निसर्गाने ती ताकद प्रत्येक सजीवाच्या पिल्लांना दिलेलीच असते. लेकराच्या वाढीची सुरुवातीची तीन चार वर्ष फार महत्वाची असतात यात त्यांच्या कोऱ्या मेंदूवर जे काही छापलं जातं ते खूप ठळकपणे उमटतं. मग पालक म्हणून आपणच ठरवायचं काय उमटलं पाहिजे आणि काय नाही ते.

विशाल गरड
दिनांक : ८ जुलै २०२१