शुभम मिसाळ हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील गोपाळवाडी या छोट्याश्या खेडेगावातला युवक. शिक्षणासाठी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या त्याच्या मामाच्या गावी आला. शाळेसाठी पांगरीला येत असल्याने शालेय जीवनापासूनच तो फेसबुकच्या माध्यमातून माझ्या संपर्कात होता. सन २०१७ साली तो माझ्या पांगरी येथील निवासस्थानी खास भेट घेण्यासाठी आला, त्यावेळेस त्याने माझ्यासाठी एक सुंदर डायरी भेट म्हणून आणली होती. त्यादिवशी त्याने माझ्या आजवरच्या सगळ्या व्याख्यानांबद्दल तसेच लिखाणाबद्दल प्रतिक्रिया दिली. “सर, मला सुद्धा असंच तुमच्यासारखं बोलायला आणि लिहायला शिकायचंय”. गेल्या पाच-सहा वर्षापासून तो माझ्या व्यक्तिमत्त्वाचे निरीक्षण करत आला. माझ्या विचारांच्या सतत संगतीत राहिला. त्यालाही वक्तृत्वाची आवड आहे हे समजल्यानंतर तो जेव्हा केव्हा मला भेटायचा, बोलायचा तेव्हा याबद्दलच आमची चर्चा व्हायची.

त्या भेटी पासून आजतागायत माझी फेसबुकची अशी एकही पोस्ट नसेल ज्यावर शुभम मिसाळची कमेंट नसेल. मला गुरुस्थानी मानणारा शुभम माझी प्रत्येक कलाकृती प्रोमोट करत राहिला. प्रतिकूल परिस्थितीत देखील विचारांची मांड पक्की करत राहिला. कुठे बोलण्याची संधी वाटली कि मी शुभमला आवर्जून ‘जा बोल’ असे सांगायचो त्यानेही कधी आळोखे पिळोखे घेतले नाही. निर्भीडपणे उत्स्फूर्त बोलत राहिला. जवळपास कुठे माझे व्याख्यान असले की शुभमला गाडीत घेऊन जायचो. माझ्या कितीतरी व्याख्यानांचा तो श्रोता राहिला आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत दिवसा शाळा आणि रात्रपाळीने एका खासगी कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीची त्याची धडपड मी नेहमीच पाहत आलोय म्हणून शुभमचे जास्त कौतुक वाटतंय. अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावाचा शुभम एक दिवस स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी होणार याची मला खात्री होती. या शिवजयंतीला शुभमने चार व्याख्याने दिली. त्याला माईकवर गर्जताना पाहून माझ्या मनाला एक वेगळाच अभिमान वाटला. एक श्रोता म्हणून माझ्या व्याख्यानातील अनेक बारकावे त्याने टिपले होते आज तो बोलताना त्यात त्याची झलक दिसतेय.

एखाद्याला वक्ता करण्याएवढा मी अजिबातच मोठा नाही पण प्रबोधन क्षेत्रातल्या माझ्या ठिपक्याएवढा कार्याचा प्रभाव पडून जर शुभम सारखे वक्ते घडत असतील तर यापेक्षा मोठा आनंद तो कोणता ? खरंतर वक्ता होणे ही एक दिर्घ प्रक्रिया आहे. आजवर हजारो व्याख्याने देऊनही मी स्वतःला या क्षेत्रातील बालवाडीचा विद्यार्थी समजतो, अजून तर यात मला मास्टर डिग्री मिळवायची आहे परंतु आज मी जो काही आहे याची सुरुवातही अशीच छोटीशी होती हे मी कधीही विसरत नाही.

फक्त स्वप्न पाहत बसण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे जास्त महत्त्वाचे असते. आजमितीस अनेक वक्ते तयार होत आहेत. कुणी प्रचंड अभ्यास करून तर कोणी तात्पुरते वाचन किंवा अनुकरण करून परंतु ही सगळी मंडळी भविष्यात चांगलं कार्य उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत याचे समाधान आहे. विचार पेरणीच्या रणांगणात प्रत्येक योद्ध्याचे स्वागत आहे. रणांगणाच्या बाहेर उभे राहून शब्दांचे युद्ध पाहणारा सैनिक जेव्हा हातात विचारांची तलवार घेऊन रणांगणात उतरतो तेव्हा रणांगणात घट्ट पाय रोवून उभा असलेल्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायलाच हवं याचसाठी हा लेखप्रपंच.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २४ फेब्रुवारी २०२०